कामचुकारांना दणका; आष्टीत डॉक्टरसह सात जणांची हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:44+5:302021-05-23T04:33:44+5:30
बीड : आष्टी येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्ण व नातेवाइकांच्या तक्रारी वाढल्यानंतर शनिवारी पहाटेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. ...
बीड : आष्टी येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्ण व नातेवाइकांच्या तक्रारी वाढल्यानंतर शनिवारी पहाटेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी आष्टी गाठत तपासणी केली. यात सर्वत्र अस्वच्छता तर होतीच शिवाय उपचाराकडेही दुर्लक्ष झाल्याचे दिसले. यावर डॉ. पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता एका डॉक्टरसह सात जणांची हकालपट्टी केली. या कारवाईने कामचुकारांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात घटत असली तरी मृत्यू राेखण्यात प्रशासन आणि आरोग्य विभाग अपयशी ठरलेले आहे. हे कमी करण्यासाठीच उपाययोजना आणि नियोजन केले जात आहे. ज्या कोरोनाबाधितांना लक्षणे नाहीत अथवा कमी आहेत, अशांवर कोविड सेंटरमध्ये उपचार केले जातात. येथेही डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉयची नियुक्ती केलेली आहे; परंतु आष्टी सीसीसीमध्ये सर्वत्र अस्वच्छता आणि रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच उपचारांकडेही डॉक्टर दुर्लक्ष करीत होते. हाच धागा पकडून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार शनिवारी सकाळीच आष्टीत दाखल झाले. अचानक तपासणी केली असता त्यांना केलेल्या तक्रारींची खात्री पटली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ डॉ. माधुरी पाचरणे या डॉक्टरसह अश्विनी पांतावणे, रूपाली काळे या परिचारिका आणि चार वॉर्डबॉयला कार्यमुक्तीची कारवाई करून हकालपट्टी केली. त्यानंतर तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांना सूचना करीत दुसरे मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे आदेश दिले. या कारवाईने मात्र इतर कामचुकारांचे धाबे दणाणले आहेत.
सिव्हिलच्या अधिकाऱ्यांनी आदर्श घ्यावा
जिल्हा रुग्णालयातील सुविधा व उपचाराबाबत रोज तक्रारी येत आहेत; परंतु स्वत: खात्री करण्याऐवजी चौकशी समिती नियुक्त करून कागद काळे केले जातात. आठवडाभर प्रकरण रेंगाळत ठेवत ‘आर्थिक’ व्यवहार करून क्लीन चिट दिली जाते. त्यामुळे केवळ अधिकारीच नव्हे तर चौकशी समितीही संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे. दोषींवर कारवाई कशी आणि किती वेळात केली जाते, हे डॉ. पवार यांनी दाखवून दिले आहे.
.....
तक्रार आली की त्याची खात्री करून कारवाई केली जाते. कोरोना महामारीत कोणी हलगर्जी करीत असेल तर बिलकूल खपवून घेतले जाणार नाही. चुकीला माफी नाहीच. मग तो काेणीपण असो. चांगले काम केल्यास पाठीवर थाप असेल अन्यथा कारवाई.
-डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.
===Photopath===
220521\22_2_bed_7_22052021_14.jpeg
===Caption===
आष्टी कोवीड सेंटरची झडती धेताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार