रुग्णालयात आलेल्या एचआयव्ही बाधिताला पोलिसांची अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:01+5:302021-05-26T04:34:01+5:30
बीड : एचआयव्ही बाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात महिन्याला आवश्यक असणारे औषध घेण्यासाठी आला. त्याला बार्शी रोडवरील चेकपोस्टवर अडवून ठेवत ...
बीड : एचआयव्ही बाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात महिन्याला आवश्यक असणारे औषध घेण्यासाठी आला. त्याला बार्शी रोडवरील चेकपोस्टवर अडवून ठेवत पोलिसांनी अरेरावी करत काठीचा धाक दाखविला. तासभर थांबवून ठेवत अपमानास्पद वागणूक दिली. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. यानिमित्ताने बीड ग्रामीण पोलिसांची दादागिरी समोर आली आहे.
विशेष म्हणजे सामान्यांना धाक दाखविणारे ग्रामीण पोलीस वाळूच्या हायवाला साधी हटकण्याची तसदीही घेत नव्हते. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. शहराच्या सर्व बाजूने चेकपोस्ट तयार करण्यात आलेले आहेत. येथे पोलीस बंदोबस्त आहे. या ठिकाणी दुधवाले, भाजीपालावाले, शेतकरी अशा लोकांची तोंड पाहून वाहने अडविण्याचे काम ग्रामीण पोलीस करीत आहेत, तर चारचाकी वाहने, वाळूचे टिप्पर अडविण्यास ते हात आखडता घेत आहेत. मंगळवारी दुपारीही अशीच एक घटना घडली. प्रत्येक महिन्याला येणारा एक एचआयव्ही बाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयातून औषधे घेऊन गावी जात होता. त्याला बार्शी रोडवरील बायपास चेकपोस्टवर अडविण्यात आले. त्याने पूर्ण औषधे आणि कागदपत्रे दाखवूनही त्याला सोडले नाही. अगोदर लायसन मागितले. ते दाखविल्यावर आरसीबुकची मागणी केली. ते दाखविल्यावर हेल्मेटचा नियम दाखविला. यासाठी त्याला तासभर थांबवून ठेवले. एवढ्या वेळात शेकडो चारचाकी वाहने आणि वाळूचे टिप्पर पोलिसांच्या समोरून सुसाट वेगाने धावले. त्यांना हटकण्याची तसदी पोलिसांनी घेतली नाही. केवळ सामान्यांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांबद्दल संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना मारहाण
ग्रामीण भागातून शहरात भाजीपाला, दूध विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना तासनतास अडवून ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही पोलिसांकडून त्यांना अडवून दमदाटी केली जात आहे. त्यांना तासभर थांबवून ठेवले जात असल्याने वेळही संपून जात आहे. काही पोलीस कर्मचारी तर या शेतकऱ्यांवर हातही उगारत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हे थांबविण्याची मागणी होत आहे.
....
रुग्णालयाची अडचण असणाऱ्यांना अडवू नका, अशा स्पष्ट सूचना सर्वांनाच दिलेल्या आहेत. असा प्रकार घडला नसेल. परंतु जरी घडला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. चुकीची माहिती देऊन पोलिसांना मुद्दाम बदनाम करण्याचा हा डाव आहे.
- संतोष साबळे, पोलीस निरीक्षक, बीड ग्रामीण.
===Photopath===
250521\25_2_bed_13_25052021_14.jpeg~250521\25_2_bed_12_25052021_14.jpeg
===Caption===
सामान्यांची वाहने थांबविणाऱ्या पेालिसांसमोरून नंबर प्लेट नसलेले वाळूचे टिप्पर बिनधास्त धावत होते. त्याचे हे बोलके छायाचित्र.~बार्शी रोडवर दुचाकीवर असलेल्या सामान्य नागरिकांसह रूग्णालयात जाणाऱ्यांना पोलिसांनी नियमांचा धाक दाखवित थांबवून ठेवले होते.