एचआयव्ही बाधित विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:20 AM2021-02-05T08:20:53+5:302021-02-05T08:20:53+5:30
बीड : एकीकडे एचआयव्ही बाधितांना समाजात सन्मान देऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, काही ठिकाणी ...
बीड : एकीकडे एचआयव्ही बाधितांना समाजात सन्मान देऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, काही ठिकाणी आजही त्यांना तुच्छ वागणूक दिली जात असल्याचे दिसत आहे. बीड तालुक्यातील पाली येथील जिल्हा परिषद शाळेतून पाच विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. यामुळे खळबळ उडाली असून, पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
पाली येथे एचआयव्ही बाधित मुलांचा सांभाळ इन्फंट इंडिया या संस्थेत केला जातो. येथे जवळपास ६४ विद्यार्थी राहतात. याच संस्थेत १ ली ते ५ वी पर्यंत शाळा आहे; परंतु शिक्षक येत नसल्याने बुधवारी येथील पहिली ते पाचवीच्या वर्गातील पाच मुले पाली येथील जिल्हा परिषद शाळेत गेली. यावेळी येथील शाळा प्रशासनाने काही ग्रामस्थांच्या सांगण्यावरून आणि एचआयव्ही असल्याने त्यांना शाळेतून बाहेर काढल्याची तक्रार इन्फंटचे दत्ता बारगजे यांनी पालकमंत्री व शिक्षण विभागाकडे केली आहे. या प्रकाराने आजही बाधितांना समाजात स्थान दिले जात नसल्याचे दिसत असून, सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, याची चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोर सत्याग्रह, बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही इन्फंट इंडिया संस्थेने दिला आहे.
कोट
जि. प. पाली येथील शाळेतून आमच्या पाच विद्यार्थ्यांना हाकलून दिले. इन्फंटच्या संस्थेतील प्राथमिक शाळेतील दोन्ही शिक्षक आतापर्यंत आलेले नाहीत. ही शाळा पालीच्या शाळेंतर्गत आहे. याबाबत आम्ही तक्रार केली आहे.
संध्य बारगजे
संचालिका, इन्फंट इंडिया, पाली
कोट
पाच मुले आली होती. परंतु, इन्फंट संस्थेत असलेल्या शाळेतील शिक्षक जावेद शेख हे आले आणि या विद्यार्थ्यांना घेऊन गेले. आम्ही त्यांना हाकलून वगैरे दिलेले नाही. त्यांचा प्रवेशही आमच्याकडे नाही. याच इन्फंटमधील ६ वी ते १० वीचे विद्यार्थी आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही दुजाभाव करणार नाहीत. झालेले आरोप खोटे आहेत.
के. एस. लाड
मुख्याध्यापक, जि. प. शाळा पाली
कोट
आठ दिवसांपासून मी आजारी होतो. दुसरे सहकारी शिक्षक रजेवर आहेत. बुधवारी मी शाळेवर गेलो. दुपारी मी पाली येथील शाळेतून पाच विद्यार्थी रिक्षा करून इन्फंटच्या संस्थेवर घेऊन गेलो. परंतु, संस्थेतील सरांनी मुलांना पाली येथील शाळेतच घालायचे आहे, असे सांगितले आणि पुन्हा त्यांना परत नेले. विद्यार्थ्यांना हाकलले नसून, मी स्वत: घेऊन गेलो होतो. झालेले आरोप व तक्रार निरर्थक आहेत.
जावेद शेख
शिक्षक, जि. प. शाळा इन्फंट संस्था बीड