संभाजी ब्रिगेडचे परळी बाजार समितीसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:34 AM2021-01-25T04:34:09+5:302021-01-25T04:34:09+5:30
परळी : आडत विक्रेते भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या कमिशन वसुली होत असल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने येथील कृषी ...
परळी : आडत विक्रेते भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या कमिशन वसुली होत असल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे म्हणाले की, भाजीपाला विक्रीवर परळी शहरातील भाजीपाला आडत दुकानदार हे शेकडा दहा रुपये कमिशन शेतकऱ्याकडून घेत आहेत. परळी, माजलगाव, आंबाजोगाई, सोनपेठ तालुक्यातील मिळून २५० शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी येथील गणेशपार रोडवरील भाजीपाला आडत मार्केटमध्ये घेऊन येतात. शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीचा हा प्रकार थांबवण्यासाठी संबंधित बीट हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकक्षेत घेण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. दरम्यान, बाजार समितीचे संचालक राजाभाऊ पौळ, सचिव बलवीर रामदासी व व सहायक निबंधकांनी आंदोलकांची भेट घेऊन संबंधित भाजीपाला बीट मार्केट हे त्यांच्या कार्यकक्षेत घेण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर संभाजी ब्रिगेड व मित्र पक्षाने धरणे आंदोलन तूर्त स्थगित केले. आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे, शहराध्यक्ष सेवकराम जाधव, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेव भालेराव, एमआयएम तालुकाध्यक्ष शेख शरीफ शेख, शहराध्यक्ष अकबर कच्ची, वंचित बहुजनचे जिल्हा सचिव मिलिंद घाडगे, शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू, कैलास सोळंके, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी मुरलीधर नागरगोजे, संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष प्रद्युम्न सोनवणे, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष नंदू शिंदे, संभाजी ब्रिगेड तालुका संघटक हनुमंत दिवटे आदींनी सहभाग नोंदविला.