ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 06:00 AM2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:20+5:30
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचा नियम असतानाही भरती प्रक्रीया थांबली आहे. याच प्रश्नावर ५ ते ८ मार्चपर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे लेखी आश्वासन दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या एकूण मंजूर रिक्त पदांपैकी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वर्ग ३ व ४ च्या पदांवर १० टक्के आरक्षणाच्या नियमान्वये रसळसेवेत नियुक्ती करण्याचे नियम केले. मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे ही भरती वारंवार टाळली जात आहे. याचा निषेध करीत ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीने बुधवारी (दि.२१) जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचा नियम असतानाही भरती प्रक्रीया थांबली आहे. याच प्रश्नावर ५ ते ८ मार्चपर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. पात्र ३२ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशही देण्यात येतील अस सांगितले होते, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने ही भरती प्रक्रीया स्थगित केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, नागपूर,चंद्रपूर, गजचिरोली, भंडारा, बुलडाणा, अकोला, लातूर, बीड, अहमदनगर, धुळे, ठाणे, ,सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आदी जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायत कर्मचारी आणि अनुकंपा पदभरतीची कार्यवाही मागील तीन महिन्यांमध्ये पूर्ण केली आहे. पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
असे असताना गोंदिया जिल्हा परिषद पदभरतीला आडकाठी का आणत आहे, हा प्रश्न असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आता पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेने पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश द्यावे व पदभरती करून घ्यावी अशी मागणी करीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि.२१) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.