होमगार्ड जवानांचा बंदोबस्तावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 07:01 PM2018-09-13T19:01:59+5:302018-09-13T19:02:38+5:30
होमगार्ड पथकाच्या जवानांनी आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
केज (बीड ) : सेवेत कायम स्वरूपी समाविष्ट करण्यात यावे यासह विविध मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी आगामी गणेशोत्सवासह पुढील धार्मिक व सार्वजनिक ठिकाणच्या बंदोबस्तावर होमगार्ड जवानांनी बहिष्कार टाकला आहे. येथील होमगार्ड पथकाच्या जवानांनी आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. ऐन गणेशोत्सवात होमगार्ड जवानांनी बंदोबस्तावर बहिष्कार टाकल्याने बंदोबस्ताचा ताण पोलीस यंत्रणेवर वाढणार आहे.
महाराष्ट्र राज्यात १९४७ पासून होमगार्ड संघटना कार्यरत असून धार्मिक ,सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आदींसह अन्य ठिकाणी बंदोबस्त करण्याचे काम राज्यातील होमगार्ड जवान अल्पशा मानधनावर आजतागायत करत आहेत. होमगार्ड संघटनेच्या वतीने राज्य शासनाकडे अनेकदा होमगार्ड जवानांना सेवेत कायम करण्यात यावे यासह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.
त्यामुळे शासनाने महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांना सेवेत कायमस्वरुपी समाविष्ट करुन घ्यावे, तीन वर्षाची पुनर्नियुक्ती रद्द करावी, मासिक वेतन देण्यात यावे तसेच होमगार्ड जवानांना वर्षभर काम द्यावे, जवानांची सेवा ६० वर्षे करावी तसेच होमगार्ड जवानांना व होमगार्ड अधिकाऱ्यांना शासनाने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या होमगार्ड संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ६५ हजार होमगार्ड जवानांना पंजाब, हरियाणाप्रमाणे कायम करण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. होमगार्ड जवानांना हातातील काम सोडून बंदोबस्त करावा लागतो. मात्र, याचे मानधन तीन ते चार महिन्यांनी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशासनाला निवेदन
मागण्या शासनाने पुर्ण न केल्यास आगामी गणेशोत्सवासह पुढील सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमासाठीच्या बंदोबस्तावर होमगार्ड जवान बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन केज येथील होमगार्ड पथकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. या निवेदनाची प्रतिलीपी मंगळवारी नायब तहसीलदार शेख यांना दिली आहे.