वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांचे मानधन नोव्हेंबरपासून थकले, अडचणी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:35 AM2021-02-11T04:35:22+5:302021-02-11T04:35:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंतांना वृद्धापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंतांना वृद्धापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये म्हणून मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ही योजना राबविली जात आहे; परंतु नोव्हेंबर महिन्यापासून या वृद्ध कलावंतांचे मानधन थकीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात नोंदणीकृत वृद्ध साहित्यिक व कलावंत अशा १४३० लोकांची शासनाकडे नोंद आहे. जिल्ह्यात केवळ जिल्हापातळीवरील कलाकार आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील एकही कलाकार नसल्याचे सांगण्यात आले. आता मागील वर्षीपासून या कलावंतांच्या मानधनात वाढ झाली असली तरी ते वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अडचणी दूर होत नसल्याचे सांगण्यात आले.
लॉकडाऊन काळात उठविला होता आवाज
- वृद्ध कलावंतांना प्रत्येक महिन्याला कधीच मानधन मिळत नाही. मागील दोन, तीन महिन्यांचे ते एकदाच दिले जाते. यामुळे त्यांना नियोजन करताना अडचणी येतात. कोरोनाकाळात तर मानधन वेळेवर मिळत नसल्याने आवाज उठविण्याची वेळ आली होती. बीडमधील नाट्य कलावंत डॉ. सुधीर निकम यांनी याबाबत पाठपुरावा करून मानधन देण्यासाठी प्रयत्न केले होते.
- बीड शहरातील संगीत कलावंत किशोरसिंग बुंदेले यांना मानधनाबाबत विचारणा केली. त्यांना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे मानधन डिसेंबर महिन्यात मिळाले होते. त्यानंतर अद्यापही त्यांच्या खात्यावर मानधन स्वरूपात एकही रुपया जमा झालेला नाही.
- वृद्ध कलावंतांना वेळेवर मानधन मिळत नाही. बीडच्या समाजकल्याण कार्यालयात गेल्यावर अर्ज घेऊन सांस्कृतिक संचालनालयाकडे पाठविला जातो; परंतु हा अर्ज करण्यासाठी त्यांना वृद्ध असतानाही काठी टेकवत टेकवत शासकीय कार्यालयाचे उंबरठे चढावे लागत आहेत.
मानधन झाले की नाही, हे समजत नाही
मानधन नियमित दिले जाते. थकीत मानधनाबाबत आमच्याकडे यादी आलेली नाही. थेट मंत्रालयातून मानधन दिले जाते. मानधन झाले की नाही हे आम्हाला समजत नाही; परंतु जर कोणाचे अर्ज आले तर आम्ही पाठवून देतो. आतापर्यंत दोन अर्ज आले आहेत, ते सांस्कृतिक कार्य संचालनालयाला पाठविले.
- राधाकिशन मंत्री, समाजकल्याण विभाग बीड