सह्याद्री देवराईत पुन्हा पालवी फुटण्याची आशा; आगीची झळ पोहोचलेल्या झाडांना पाण्याचे सलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 12:07 PM2022-02-15T12:07:23+5:302022-02-15T12:07:59+5:30
दोन आठवड्यांत झाडे पूर्ववत होतील असा वनविभागाला विश्वास
बीड : शहरापासून जवळच असलेल्या पालवर येथील सह्याद्री-देवराई परिसरात शनिवारी दुपारी अचानक आग लागून मोठ्या प्रमाणावर गवत जळाले तर ३२० झाडांना झळ लागली. क्षतीग्रस्त झाडांना तीन टँकरद्वारे पाणी देत परिसर पुन्हा फुलविण्याचे प्रयत्न वन विभागाने सुरू केले असून दोन ते तीन आठवड्यात झाडे पूर्ववत चांगली होतील, असा आशावाद वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शनिवारी दुपारी सह्याद्री देवराई परिसरात आग लागून गवत पेटले होते. ही बाब माथ्यावर काम करणारे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच एअर ब्लोअर व अन्य पद्धतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. चार वर्षांत प्रथमच असा प्रकार घडल्याने सह्याद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे, अरविंद जगताप यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी दु:ख व्यक्त केले. दरम्यान आगीमुळे उजाड झालेला परिसर तसेच क्षतीग्रस्त झाडांना पुन्हा फुलविण्यासाठी वन विभागाने रविवारपासून प्रयत्न सुरू केले आहेत. वनअधिकऱ्यांनी केलेल्या निरीक्षणातून ३२० झाडांना झळ पोहोचल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार परिसर व क्षतीग्रस्त झाडांना पाणी दिले जात असल्याचे सांगण्यात आले.
कठोर प्रतिबंधाची गरज
मागील चार वर्षांपासून पालवण परिसरातील वन विभागाच्या २०७ हेक्टर क्षेत्रात सह्याद्री-देवराई परिसर फुलविण्यात येत आहे. परिसरात फिरायला, सहलीला, वाढदिवस साजरा करायला अनेक जण येथे येतात. मात्र, शनिवारी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आता देखरेखीसाठी २४ तास कर्मचाऱ्याची नियुक्ती, तसेच येणाऱ्यांवर कठोर प्रतिबंध लावण्याची गरज आहे. नागरिकांनीही वनसंपत्तीचे जतन व संरक्षण करण्याबाबत सकारात्मक राहण्याची गरज असल्याचे बोलले जाते.
सह्याद्री देवराई परिसरात आगीच्या घटनेनंतर पाहणी करून क्षतीग्रस्त झाडे फुलविण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. जवळच असलेला तलाव तसेच डोकेवाडा तलाव आणि परिसरातील खासगी विहिरींवरून तीन टँकरने आणलेले पाणी कर्मचाऱ्यांमार्फत सह्याद्री देवराईतील परिसर व झाडांना दिले जात आहे. लवकरच परिसर पूर्ववत होईल. येथे रोज एक पहारेकरी व शनिवार आणि रविवारी दोन पहारेकरी नियुक्त केले जात आहेत.
- अमाेल मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बीड.