स्थलांतरीत विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा आधार; शिरूर कासार येथे ५२ वसतिगृहात आहेत २२१५ विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 05:17 PM2017-12-22T17:17:32+5:302017-12-22T17:17:39+5:30
शिरुर कासार तालुक्यात ऊसतोड मजुर पाल्यांसाठी हंगामी वसतिगृहांच्या ७१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ५२ वसतिगृह सुरु असून, त्यात ११३४ मुले तर १०८१ मुलींना सकाळी अल्पोहार, संध्याकाळची भोजन व्यवस्था करण्यात येते.
बीड : शिरुर कासार तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या स्थलांतराचा परिणाम पाल्यांच्या शिक्षणावर होऊ नये म्हणून शिक्षण विभागाकडून हंगामाआधीच सर्वेक्षण करुन मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात. स्थलांतर रोखलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय म्हणून त्यांना वसतिगृहात प्रवेश देऊन शिक्षणातील अडथळा दूर करण्यात आला आहे.
तालुक्यात ऊसतोड मजुर पाल्यांसाठी हंगामी वसतिगृहांच्या ७१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ५२ वसतिगृह सुरु असून, त्यात ११३४ मुले तर १०८१ मुलींना सकाळी अल्पोहार, संध्याकाळची भोजन व्यवस्था करण्यात येते. दुपारी शाळेतच पोषण आहार दिला जातो. तालुक्यातून मोठ्या संख्येवर ऊसतोड मजूर स्थलांतरीत होतात. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाला फटका बसू नये तसेच शिक्षणाच्या प्रवाहापासून ते वंचित राहू नये म्हणून सर्वशिक्षा विभागाकडून महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येतो. परंतु शाळेच्या वसतिगृहाबाबत देखील भ्रष्टाचाराची कीड दिसून आल्याने यात पारदर्शकता आणण्यासाठी बायोमॅट्रीक पद्धती, आॅनलाईन उपस्थिती आणि त्याचा वरिष्ठांना नित्य अहवाल देणे यामुळे हा आकडा वाढवता येणे शक्य नसल्याने वसतिगृहाच्या व लाभार्थ्यांच्या संख्येत मात्र घट झाल्याचे दिसून येत आहे.
पारदर्शक कारभार
मागील वर्षी वसतिगृहाचा आकडा ६९ होता तो ५२ झाला असल्याने पारदर्शक पद्धतीला काही अंशी यश आले म्हणावे लागेल. वेळोवेळी वसतिगृहांना भेटी देऊन त्यांना दिल्या जाणार्या भोजन व्यवस्थेची पाहणी करण्यात येत आहे. जेथे गरज आहे तेथे आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे गटशिक्षण अधिकारी जमीर शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.