'घराघरात भांडण लावणारे रडताहेत'; क्षीरसागरांचा पवार काका-पुतण्यांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 03:35 PM2019-10-01T15:35:48+5:302019-10-01T16:56:53+5:30
आमच्या नियतीत खोट नसून आमची नियत साफ आहे.
बीड : आमच्या नियतीत खोट नसून आमची नियत साफ आहे. आम्ही कुणाचे वाईट केले नाही आणि भविष्यातही आमच्याकडून तसे होणार नाही. जसे कर्म तसे फळ मिळते. घराघरात भांडण लावणारे आज रडत आहेत, असा टोला नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना लगावला.
ते म्हणाले की, मागील अनेक निवडणुकात या भागातील नागरिकांनी आण्णांना पक्षीय भेद बाजूला सारून खंबीर साथ दिलेली आहे. आपण वॉचमन, ड्रायव्हर, नोकर कामावर ठेवतांना तीनदा विचार करतो, ही विधानसभेची निवडणूक आहे. आपला लोकप्रतिनिधी कोण असावा. त्याला विकासाची तळमळ आणि निर्णय घेण्याची क्षमता असावी. आण्णांना विकासाची जाण असून स्व.काकूंच्या काळापासून सर्वाना सोबत घेवून माणूस आणि माणुसकी जोपासत विकास कामांना सदैव प्राधान्य देत आण्णांच्या माध्यमातून दारूल उलूम, इदगा कंपाऊड, बालेपीर कब्रस्थान कंपाऊंड भित, सांस्कृतिक सभागृहाची उभारणी करण्यात आली.
मोमीनपुरा भागात नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मैनुद्दीन भाई, राजु भाई, राजु राणा, माजेद कुरेशी, एकबाल भाई, कलाम, शाहरु ख भाई, शेख राजू, राजभाई आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की विकास कामाच्या बळावर आम्ही मते मागत असून विरोधकांनी विकासाचे एक तरी काम केले का? हे त्यांनी दाखवून द्यावे. विकास कामे करण्यासाठी विकासाची दृष्टी असावी लागते ती केवळ ना.आण्णांकडे असून केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याचा पाठपुरावा करून आण्णांनी शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी अमृत अटल पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना, सांस्कृतिक संभागृह, अंतर्गत रस्ते यासह नागरी विकासाची कामे सर्वाना सोबत घेवून केलेली आहेत. आम्ही विकासाची अनेक कामे केली पण केवळ प्रसिध्दी, बोर्डासाठी कधीही काम केले नाही. मतदार संघाच्या विकासासाठी आणि भाईचारा, शहराच्या शांततेसाठी लोक आम्हाला विश्वासाने मतदान करीत आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलतांना राजु राणा म्हणाले की स्व.काकूंच्या काळापासून क्षीरसागर परिवाराने शांतता, विकास आणि भाईचारा जोपासला आहे. परिसराच्या विकासासाठी आण्णांच्या मागे ताकत उभी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलतांना कलीम म्हणाले की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वानी आण्णांच्या मागे मोठी शक्ती उभी करण्याची आवश्यकता असून स्व.काकू व आण्णांनी मागील चाळीस वर्षापासून विकासाचे जाळे निर्माण केले आहे. आण्णा हे काम करणारे राज्य पातळीवरील नेतृत्व असून त्यांचा विजय कोणी ही रोखू शकत नाही. विरोधक विरोधासाठी विरोध करतात पण विकासाची जाण असलेल्या आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलतांना राजुभाई नवले म्हणाले की मोमीनपुरा भागात शिवसेना सुरवातीला मी आणली, आपल्या उज्वल भविष्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करा. याप्रंसगी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तर कार्यक्रमासाठी परिसरातील व्यापारी, नागरिक, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.