घरकूल लाभार्थ्यांना निधीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:56+5:302021-08-21T04:37:56+5:30
अंबेजोगाई: अंबेजोगाई शहर नगरपालिका स्तरावर राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या घरकूल योजनांचे निधी काही लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांना ...
अंबेजोगाई: अंबेजोगाई शहर नगरपालिका स्तरावर राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या घरकूल योजनांचे निधी काही लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांना निधीची प्रतीक्षा लागली आहे. केंद्र, तसेच राज्य स्तरावरून निधी न मिळाल्याने, पालिका प्रशासन याबाबत पाठपुरावा करत आहे. लाभार्थी मात्र न.प.त खेटे मारून निधीची विचारणा करीत आहेत.
--------------------------
वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
अंबेजोगाई: वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून पिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत. त्यामुळे या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, तसेच वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी कृषी अधिकारी, तलाठ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
------------–---------------
ध्वनिप्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
अंबेजोगाई: काही तरुण मोठ्या प्रमाणात दुचाकीवर वेगवेगळे हॉर्न लावून वाजवितात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन, अशा वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
--------------------------------------
उघड्यावरील खाद्यपदार्थ आरोग्यास धोकादायक
अंबेजोगाई: शहरातील काही भागांत उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री केले जात असल्यामुळे, यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
--------------------------------
दुर्गम भागात लसींचा पुरवठा करावा
अंबेजोगाई: तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील लसींचा पुरवठा करण्याची मागणी आहे. अनेक ठिकाणी लसच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्य केंद्रांसोबतच उपकेंद्रांमध्ये लसींचा पुरवठा करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पाऊस सुरु असल्याने साप निघण्याचे प्रकार वाढले आहेत. यातून अपाय होण्याची भिती आहे.