६० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कसे होणार पूर्ण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:22 AM2021-06-23T04:22:16+5:302021-06-23T04:22:16+5:30
बीड : मोठा गाजावाजा करत विभागीय आयुक्तांनी बीड जिल्ह्यासाठी ६० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. पर्यावरण ...
बीड : मोठा गाजावाजा करत विभागीय आयुक्तांनी बीड जिल्ह्यासाठी ६० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यातदेखील आले; मात्र त्यानंतर वृक्ष लागवडीची मोहीम थंडावली असून, वन विभाग व सामाजिक वनीकरण या विभागांकडे एवढे रोपेच शिल्लक नसल्यामुळे ६० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रति व्यक्ती दोन झाडं लावण्याचा उपक्रम विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात राबवण्यात येणार होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड जिल्ह्यात होणे अपेक्षित होते; मात्र वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे त्यांचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करून जवळपास १० लाख रोपं शिल्लक राहतात, त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या ६० लाख वृक्ष लागवडीसाठी रोपच उपलब्ध नाही. वन विभागास शासनाने जवळपास ५ लाख ५० हजार वृक्ष लागडीचे उद्दिष्ट यावर्षी दिले आहे. ते पूर्ण करून जवळपास १० लाख रोपं त्यांच्याकडे शिल्लक राहतात. तर, सामाजिक वनीकरण विभागाला किती उद्दिष्ट देण्यात आले आहे, तसेच ६० लाख वृक्ष लागवडीसाठी किती रोपं दिली जाणार, याची माहिती कार्यालयाकडून मिळू शकली नाही. इतर विभागांना रोपांची पूर्तता कुठून करण्यात येणार आहे, तसेच वृक्ष लागवड उद्दिष्ट पूर्ण कसे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वृक्ष लागवड एक दिवसीय ‘इव्हेंट’
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने फक्त एक दिवस प्रशासनाकडून झाडं लावण्याचा इव्हेंट करण्यात आला. त्यानंतर मात्र कोणत्या विभागाला किती उद्दिष्ट होते, त्यांनी वृक्षारोपण केले का, यासंदर्भात पाठपुरावा केलेला दिसून येत नाही. त्यामुळे फक्त इव्हेंट झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
चौकशी समिती लवकरच बीडमध्ये
३३ कोटी वृक्ष लागवडीसंदर्भातील विधानभवन चौकशी समिती लवकरच बीड दौऱ्यावर येणार असून, वन विभागातील ८ लाख रोपं खरेदीचा मुद्दा अधिकाऱ्यांसाठी अडचणीचा असून, यामध्ये अधिकारी व लिपिक यांच्यात अहवालावरील स्वाक्षरीवरून वाद झाल्याची सूत्रांची माहिती असून, त्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचीदेखील सूत्रांची माहिती आहे.
५० कोटी वृक्ष लागवड योजनेतील भ्रष्टाचारप्रकरणी अनेक पुरावे आहेत. त्यासंदर्भात तक्रारीदेखील करण्यात आल्या आहेत. चौकशी समितीकडेदेखील पत्र पाठवून सर्व माहिती देण्यात आली असून, या प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येणार आहे.
डॉ.गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते.
===Photopath===
220621\22_2_bed_6_22062021_14.jpeg
===Caption===
वृक्ष लागवड