जिल्ह्यातील पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:33 AM2021-05-13T04:33:33+5:302021-05-13T04:33:33+5:30
बीड : जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रशासन व सामाजिक संस्था प्राणपणाने कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, या काळात ...
बीड : जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रशासन व सामाजिक संस्था प्राणपणाने कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, या काळात पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील मानसिक थकवा वाढत असल्याचे चित्र आहे. हा थकवा कमी करण्यासाठी ना सुटी मिळतीय, ना त्यांच्या कुटुंबाला वेळ देता येतोय. त्यामुळे हा मानसिक थकवा घालवण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना राबवण्याची गरज आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. या काळात मात्र, आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तर, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील चोख नियोजन करण्यात आल्यामुळे दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात वाढ झाली आहे. दोन्ही विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा संपर्क दिवसभरात अनेकांशी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती देखील मोठी आहे. अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना याची लागण देखील झाली होती. तर, काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मानसिक थकवा घालवण्यासाठी विशेष उपायोजना राबवून रिक्त जागा भरण्याची मागणी होत आहे.
.........................................................................................................................
कुटुंब अन् नोकरी सांभाळण्याची कसरत
आरोग्य विभागावर ताण वाढलेला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक वेळ कर्तव्य बजवावा लागत आहे. दरम्यान यामुळे मानसिक ताण वाढलेला असून, तो घालवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शिबिर अथवा इतर उपाययोजना राबविण्यात आलेल्या नाहीत.
-एक आरोग्य कर्मचारी.
.......................
आम्ही करत असलेल्या कामामुळे संपूर्ण कुटुंब कायम धोक्यात राहत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी कुटुंबापासून दूर रहावे लागत आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढला असून, तो दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात.
-एक पोलीस कर्मचारी.
.........................
कोरोना संसर्ग वाढल्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन व निर्बंधांचे पालन नागरिकांनी देखील पाळले पाहिजेत. जेणे करून काही प्रमाणात मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल. आम्ही पण माणूस आहोत या दृष्टीने विचार करावा.
-एक पोलीस अधिकारी
...........
ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून, प्राणायम, योगासने व मानसिकता सुस्थितीत राहण्यासाठी विविध प्रकारची शिबिरे घेण्याची गरज आहे. मात्र, त्या दृष्टीने अद्याप प्रशासनाकडून विचार करण्यात आलेला नाही.
एक आरोग्य कर्मचारी
..............
पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी योगा व इतर उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. तर, ज्यांना आवश्यकता असेल अशा कर्मचाऱ्यांचे आम्हा अधिकाऱ्यांमार्फत समुपदेशन केले जाते. घरी उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत देखील आम्ही वेळोवेळी बोलत आहोत.
-सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, बीड.
.................
रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागावरच ताण वाढलेला आहे. त्यामुळे अनेकांना मासिक थकवा जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, रुग्णांवर उपचार करणे हेच प्रथम प्राधान्य असल्यामुळे विशेष योजना राबविणे अद्याप तरी शक्य झालेले नाही. मात्र, यापुढे विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.
-डॉ. आर. बी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.
..............
एकूण आरोग्य कर्मचारी -
डॉक्टरर्स -
एकूण पोलीस अधिकारी २,१६८
पोलीस अधिकारी १८०
.............