माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:38 AM2021-08-24T04:38:08+5:302021-08-24T04:38:08+5:30
बीड : कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. मागील वर्गातील गुण आणि चालू वर्षातील तोंडी, प्रात्यक्षिक व ...
बीड : कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. मागील वर्गातील गुण आणि चालू वर्षातील तोंडी, प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचे गुणदान करण्यात आले. मात्र, निकालानंतर मूल्यांकन करणारे ‘गुरुजी पास आणि विद्यार्थी नापास’ असा अनुभव सातत्याने अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आला आहे. माझ्यापेक्षा मित्राला जास्त गुण मिळाले, माझ्यापेक्षा मैत्रिणीला जास्त गुण मिळाल्याचे हे विद्यार्थी खासगीत बोलतात.
लेखी परीक्षा घेतली असती तर बरे झाले असते. पालक म्हणून आम्ही तयार होतो, मुलांची काळजी घेतली असती. मात्र, शासनाने पाऊल उचलले नाही. त्यामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान झाल्याची प्रतिक्रिया पालक व्यक्त करत आहेत.
दहावीनंतर अकरावी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार होती. दहावीला कमी मार्क मिळालेल्या परंतु चांगल्या गुणांची खात्री असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची तयारी केली होती.
मात्र, सीईटीदेखील रद्द करण्यात आली. मूल्यांकनात कमी गुण मिळाल्याने ‘ड्रीम कॉलेज’ मिळणार नाही, अशी चिंता विद्यार्थी आणि पालक व्यक्त करीत आहेत.
दहावीचे विद्यार्थी - ४०,५४०
पास झालेले विद्यार्थी - ४०,५२२
बारावीचे विद्यार्थी - ३५,००८
पास झालेले विद्यार्थी - ३४,७३९
परीक्षा नाही, पुनर्मुल्यांकनही नाही (बॉक्स)
दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर अपेक्षेनुसार गुण मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. मात्र, पुनर्मुल्यांकन नाही आणि आणि अकरावीसाठी सीईटी नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने हे वर्ष मुलांच्या दृष्टीने नुकसानीचे गेल्याचे पालकांनाही जाणवत आहे. आता मिळेल त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन बारावीचा गड सर करण्याचा निश्चय गुणवत्तेची खात्री असणारे विद्यार्थी करीत आहेत.
मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला जास्त गुण कसे?
काही विद्यार्थ्यांना अनपेक्षितपणे अपेक्षेपेक्षा जास्त गुण देण्यात आलेले आहेत. ज्यांनी प्रामाणिकपणे खरोखर अभ्यास केला तसेच परीक्षा लेखी घेतली असती तर गुणवत्ता सिद्ध करू शकले असते, असे विद्यार्थी मात्र नाराज आहेत. त्यांचे पालकही नाराजी दर्शवितात. अनेक पालक आणि विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांशी या विषयावर बोलत खंत व्यक्त करतात.
विद्यार्थी म्हणतात...
मला ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणांची अपेक्षा होती. त्यादृष्टीने मी अभ्यासाची तयारी केली होती. क्लासेस केले होते. लेखी परीक्षा झाली असती तर जास्त गुण मिळाले असते. गुणवत्ता सिद्ध करता आली असती. मैत्रिणींनादेखील अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. --श्रेया भगीरथ बियाणी, विद्यार्थी, बीड.
-----
निकालासाठी केलेले मूल्यांकन पटलेले नाही. खऱ्या गुणवत्तेवर ते नसल्याने मी समाधानी नाही. वर्षभर अभ्यास केला. परीक्षा झाली नाही. त्यामुळे माझी खरी गुणवत्ता कळलीच नाही. अपेक्षेनुसार महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. अकरावी सीईटी झाली नसल्याच्या कारणांमुळे मुलांमध्ये नैराश्य येते. -- स्वप्नील मेघराज कोल्हे, विद्यार्थी, बीड.
पालक म्हणतात
माझ्या मुलाला ९८पेक्षा जास्त गुणांची अपेक्षा होती. लातूरच्या महाविद्यालयात घेतलेल्या परीक्षेत फाऊंडेशन बॅचसाठी तो निवडला गेला. मात्र, आता सीईटी रद्द केल्याने या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल की नाही, हे सांगता येत नाही. अकरावी प्रवेशासाठी सीईटी अपेक्षित होती. ज्या विद्यार्थ्यांनी खरोखर वर्षभर अभ्यास केला, त्यांना संधी मिळाली असती. --वल्लभ गोडबोले, पालक, बीड
-------
माझ्या मुलाला ९२ टक्क्यांच्या पुढे अपेक्षा होती. मात्र, मूल्यांकनात शाळेने कमी गुणांकन केले आहे. आता काहीच करू शकत नाही. चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार नसला तरीही आम्ही खचलेलो नाही. बारावीनंतरच्या नीट परीक्षेवर लक्ष केंद्रित करून मुलगा अभ्यासाला लागला आहे. त्यावेळी खरी गुणवत्ता तो नक्कीच सिद्ध करेल. - स्वीटी शीतल कोटेचा, पालक, बीड.