संदीप क्षीरसागरांचे घर कसे पेटले? तब्बल एक महिन्यांनी फुटेज हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 09:30 AM2023-12-01T09:30:36+5:302023-12-01T09:36:59+5:30
Beed News: माजलगावात आ. प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटविल्यानंतर सायंकाळच्या सुमारास बीडमधील आ. संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांचे घरही पेटविण्यात आले होते. याच घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता हाती लागले आहे.
बीड - मराठा आरक्षणासाठी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला ३० ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले होते. माजलगावात आ. प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटविल्यानंतर सायंकाळच्या सुमारास बीडमधील आ. संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांचे घरही पेटविण्यात आले होते. याच घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता हाती लागले आहे.
एक पांढऱ्या रंगाच्या शर्टामधील तरुण गेट तोडून आत प्रवेश करतो. इतर साथीदार दुसरे गेट तोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यातील एक जण आतमध्ये आलेल्या सर्वांना बाहेर काढून पुन्हा गेट लावतो; नंतर १० ते १५ तरुण गेट तोडून घरात प्रवेश करतात. अगोदर त्यांनी घरावर व बाहेर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक केली. बाजूलाच उभ्या असलेल्या पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीचे समोरील लाइट व काच फोडण्यात आली. त्यातील एकाने आपल्या खिशातील काडेपेटी काढून कागदाच्या मदतीने पेटवून समोर बॉनेटवर टाकली; परंतु पेट न घेतल्याने तोच कागद फुटलेल्या काचांतून चालकाच्या बाजूच्या साइडच्या सीटवर टाकला. यामुळे गाडीने पेट घेतला.
सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. जाळपोळ पेट्रोल बॉम्बने केली, असा काहीही पुरावा हाती लागला नाही. बाजूच्याच दुचाकींमधून बाटलीत पेट्रोल काढून जाळपोळ केल्याचे अनेक फुटेजमध्ये दिसत आहे.
-संतोष साबळे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड