मी केलेल्या कामाचे श्रेय धोंडे यांना कसे ?: धस यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:16 AM2018-07-16T01:16:43+5:302018-07-16T01:17:05+5:30
आष्टी : मातावळी ते हरिनारायण आष्टा, दौलावडगाव ते सावरगाव या दोन रस्त्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले. त्यानुसार मंजुरीची आॅर्डर झाली आहे. त्यामुळे आष्टी मतदारसंघाचे आ. भीमराव धोंडे यांनी मी मंजूर केलेल्या या कामांचे श्रेय घेऊ नये. स्वत: मंजूर करुन आणलेली कामेच सांगावीत, असा सल्ला आ. सुरेश धस यांनी दिला.
रविवारी आष्टी येथे धस यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. धोंडेंना श्रेय न लाटण्याचा सल्ला दिला. आ. धोंडे यांनी जे काम केले, ते मला मान्य आहे पण माझ्या पत्राने मंजुरी घेतलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये, असे ते म्हणाले. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा नियोजन मंडळातून आष्टी ते चिखली, दैठण हा रस्ता मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत आ. धस म्हणाले, सोशल मीडियावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फेक अकाउंट तयार केले आहेत. हा सगळा पक्ष सध्या फेक अकाउंटवर चालतो, असा आरोप त्यांनी केला. स्वत:च कमेन्ट लाईक वाढवून राष्ट्रवादी खूप मोठा पक्ष असल्याचा देखावा करत असल्याचे ते म्हणाले.
रवी बांगर, पंकज मुंडे या दोन नावांनी फेक अकाऊन्ट तयार करुन अनेकांची बदनामी केली आहे. हे व्यक्ती विरोधी पक्षनेत्यांनी सर्व नागरिकांसमोर उभे करावे, आपण राजकारण सोडून देऊ असे आव्हान धस यांनी दिले. ते म्हणाले, कधी मुख्यमंत्री तर कधी पंकजा मुंडे तर कधी माझ्याबद्दल खोट्या नावांनी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या जात आहेत. अशा फेक अकाऊन्टचा शोध घेऊन त्या राकॉँ कार्यकर्त्यांवर मकोकाअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केल्याचे धस म्हणाले.