‘तोडपाणी’वाला वारसदार कसा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 11:42 PM2019-01-05T23:42:12+5:302019-01-05T23:42:49+5:30
बेईमानी मला जमत नाही, इमानदारींने मी काम करते. जो स्वार्थासाठी पदोपदी वारसा बदलतो, ज्याचे राजकारणच तोडपाणीचे झाले आहे. विधिमंडळात लक्षवेधीसाठी ‘रेट’ ठरविणारे हे मुंडेसाहेबांचे वारसदार असूच शकत नाहीत, अशा शब्दात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर थेट हल्ला चढवित आगामी लोकसभा निवडणुकीचे एका अर्थाने रणशिंगच फुंकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : बेईमानी मला जमत नाही, इमानदारींने मी काम करते. जो स्वार्थासाठी पदोपदी वारसा बदलतो, ज्याचे राजकारणच तोडपाणीचे झाले आहे. विधिमंडळात लक्षवेधीसाठी ‘रेट’ ठरविणारे हे मुंडेसाहेबांचे वारसदार असूच शकत नाहीत, अशा शब्दात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर थेट हल्ला चढवित आगामी लोकसभा निवडणुकीचे एका अर्थाने रणशिंगच फुंकले. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या परळीतील मोंढा मार्केटमधील आयोजित समारंभात त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी खा.डॉ.प्रीतम मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.आर. टी. देशमुख, आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, दत्ताप्पा इटके, विकासराव डुबे, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक अनिल तांदळे, प्रकाश जोशी, प्रकाश सामत, डॉ. शालिनी कराड आदी उपस्थित होते.
परळी ही लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची व माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. त्यामुळे इथल्या जनतेची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी शहराच्या भविष्याची दोरी माझ्या हातात दिली आहे. इथे मला स्वच्छ, सुंदर व भयमुक्त वातावरण तयार करायचे आहे. मी तुमच्यासमोर केंव्हाही नतमस्तक आहे पण ज्या लोकांनी इथलं वातावरण गढूळ केलयं त्यांना साथ देण्याची चूक कधीही करू नका, विधान परिषदेची एकही जागा ज्याना निवडून आणता आली नाही, तो नेता कसला, असा टोलाही त्यांना पंकजा मुंडे यांनी लगावला. शहरातील गुंडगिरी संपवण्यासाठी मी जनतेच्या पाठीशी आहे. समोरुन येणारा वार मी अगोदर माझ्या खांद्यावर झेलेल, असा विश्वास देत ‘ज्या दिवशी मला घालवाल. त्यादिवशी तुमचे परळीत राहणे अवघड होईल, गुंडगिरी वाढेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिली.
मी माझ्या वडिलांचे नाव लावते याचा अनेकांना त्रास होतो. राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा विकास करण्यासाठी त्यांना दमडीही आणता आली नाही. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. विकास आपणच करु शकतो. परळी नगर परिषद जर भाजपच्या ताब्यात असती तर पाच कोटीच काय, पाचशे कोटीची कामे आणली असती, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांचे नाव न घेता आक्रमक होऊन भाषण केले. पंकजा मुंडे यांच्यामुळेच ‘२५१५’ हा निधी सर्वांना माहीत झाला. जलयुक्त शिवारमधून त्यांनी व खासदार निधीतून मी या शहराला पाणी दिल्याचे त्यांनी सांगितले. आ. सुरेश धस यांनीही धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली. गायब सिनेमाचा उल्लेख करुन त्यांनी खिल्ली उडवली.
उमेदवार कुणी असो, आम्हाला फरक पडत नाही
बीड : विरोधी उमेदवार कुणीही असो, आम्हाला काही फरक पडत नाही. विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी संसदेत आणि मतदार संघात भरीव कामगिरी केली. विकासासाठी निधी आणलाच नाही तर कामे करून मार्गी लावला. त्यामुळे लोकसभेसाठी आमच्या विरोधात कोण? याची चिंता आम्ही करत नाही कारण मतदार आणि विकास कामे आमच्या पाठीशी आहेत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड येथे आल्या असता विश्रामगृहावर चर्चा करताना त्या बोलत होत्या. राष्टÑवादीतर्फे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावाचीही चर्चा आहे, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, काय फरक पडतो? विधानसभा निवडणुकीत आम्ही दोघे एकमेकाच्या विरोधात लढलो. मी जिंकले. एकवेळ तर मी सोडून बाकी पाचही मतदार संघात राष्टÑवादीचे उमेदवार होते. ते जिल्ह्याचे नेते होते. काय झाले.. मुंडेसाहेब विजयी झाले. आता तर उलट स्थिती आहे, बीड सोडून आमचे सहा आमदार आहेत. मतदार हे काम बघतात. त्यामुळे निकालाची, उमेदवाराची चिंता विरोधकांनी करावी. जिल्ह्याच्या विकासासाठी इतका निधी आणला आहे की तो वेळेत कसा खर्च होईल, याची चिंता आम्हाला आहे, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.