शासनाकडून शेतकऱ्यांना किती मदत मिळाली ?- कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:30 AM2019-01-07T00:30:00+5:302019-01-07T00:30:28+5:30
शासनाकडून शेतक-यांना किती मदत मिळाली हे सर्वांनाच माहिती आहे, असा प्रश्न पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या परिस्थितीत शासनाकडून शेतक-यांना किती मदत मिळाली हे सर्वांनाच माहिती आहे, असा प्रश्न पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थित केला. त्यामुळे शेतक-यांना मदत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने कार्यक्रम राबवला जाणार आहे. ९ जानेवारीपासून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात बीडमधून होणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी कदम बीडमध्ये आले आहेत. यावेळी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार सुनील धांडे, औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, कुंडलिक खांडे, बाबासाहेब पिंगळे, चंद्रकांत नवले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना कदम म्हणाले मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहेच. सर्व राजकीय पक्षांनी द्वेष सोडून मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. शासनाच्या वतीने दुष्काळी परिस्थितीमध्ये तात्काळ मदत करणे अपेक्षित आहे. पाणीटंचाई तीव्र असल्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांसह जनावरांना पाण्याची व्यवस्था करावी, तसेच चारा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे. त्याठिकाणी शिवसेनेच्या वतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या दुष्काळामध्ये शिवसेनेच्या वतीने २ हजार शेतकरी कुटुंबातील मुलामुलींचे विवाह मोफत लावले होते. हा प्रयोग देखील यावर्षी करण्यात येईल, अशी माहिती कदम यांनी यावेळी दिली.
तुम्ही सरकारमध्ये आहात; मग शासनाच्या वतीने उपाययोजना का राबवल्या जात नाहीत, या प्रश्नाला उत्तर देताना कदम म्हणाले की, आम्ही सरकारला टेकू लावलेला आहे. त्यामुळे सत्तेत असून नसल्यासारखे आहोत. दुष्काळी भागात मदत देणे हा सामाजिक उपक्रम आहे आणि शिवसेनेचे सर्व मंत्री व पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.