उन्हाळ्यात अंगणवाडीच्या बालकांची तहान कशी भागवायची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:45 AM2021-02-27T04:45:29+5:302021-02-27T04:45:29+5:30
बीड : शासनाचे आदेश असूनही जिल्ह्यातील १७०९ अंगणवाड्यांना नळजोडणीच नसल्याने बालकांची तहान उन्हाळ्यात कशी भागविणार असा प्रश्न आहे. बीड ...
बीड : शासनाचे आदेश असूनही जिल्ह्यातील १७०९ अंगणवाड्यांना नळजोडणीच नसल्याने बालकांची तहान उन्हाळ्यात कशी भागविणार असा प्रश्न आहे. बीड जिल्ह्यात २९५७ अंगणवाड्या सध्या कार्यरत आहेत. डिसेंबर २०२० मध्ये शासन निर्णयानुसार १०० दिवसांत अंगणवाड्यांना १०० टक्के नळ कनेक्शन देण्याचे आदेश होते. एका अंगणवाडीसाठी ४,९०० रुपयांपर्यंतचे अनुदान शासनाकडून मिळते. पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामपंचायतीमार्फत ही नळजोडणी करण्याची योजना आहे. अंगणवाड्यांना नळजोडणी दिल्यास पिण्याचे पाण्याची सोय आणि इतर वापरासाठी पाणी उपलब्ध करण्याचा या योजनेचा उद्देश बीड जिल्ह्यातील ११८७ अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देण्यात आलेले आहे. मात्र, १७०९ अंगणवाड्या अजूनही नळजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.
-----
अंगणवाड्या तूर्त बंद पण...
अंगणवाड्यांना मेमध्ये जरी सुट्या असल्या तरी मार्च, एप्रिल आणि जूनपर्यंत पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असतो. अंगणवाड्यांना नळजोडणी नसेल तर पाणी आणायचे कोठून हा प्रश्नच आहे. कोरोनामुळे वर्षभरापासून अंगणवाड्या बंदच आहेत. या कालावधीत सध्या अडचण जाणवत नसली तरी जेव्हा अंगणवाड्या सुरू होतील, तेव्हा तिथे नळजोडणी नसल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो.
---------
या आहेत अडचणी
काही ठिकाणी शाळा-अंगणवाडी जोडलेल्या अथवा लगतच आहेत. तेथे आधीच जोडणी असल्याने नवीन नळ जोडणी कशाला? त्यामुळे जोडणी देण्यास तांत्रिक अडचणी आहे. काही ठिकाणी अंगणवाडीला इमारत नाही. नळजोडणीसाठी अंगणवाडी पर्यवेक्षकांकडून ग्रामसेवकाकडे रीतसर मागणी करावी लागते. ती न केल्याने नळजोडणी करणे अशक्य ठरते.
---
पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना नळजोडणीवर खर्च करण्याची तरतूद आहे. शासनाच्या स्वजलधारा, जलस्वराज्य, भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल, मुख्यमंत्री पेयजल, जलमणी, प्रादेशिक पाणीपुरवठा अशा
विविध योजनेतून नळ पाणीपुरवठा योजना स्रोत उपलब्धतेच्या ठिकाणी परिपूर्ण आहेत, तर बहुतांश ठिकाणी नळयोजना अपूर्ण आहेत. काही ठिकाणी स्रोत कोरडे अथवा बाधित आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांची नळजोडणी रखडली आहे.
------
बीड जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील लाभार्थी बालके - १,८१,६९७
कार्यरत अंगणवाड्या -२९५७
-------
जिल्ह्यातील स्थिती
अंगणवाडी (मोठ्या, लहान) नळजोडणी नसलेल्या अंगणवाडी
अंबाजोगाई २५६ ७०
धारूर १४३ ४१
वडवणी १११ ४०
माजलगाव २७३ ११३
आष्टी ३७५ २१७
गेवराई ४०६ २५१
पाटोदा १६८ १०९
बीड ४३७ २९५
परळी २४५ १७९
केज २९१ २१५
शिरूर १९१ १७९
एकूण २८९६ १७०९
----------------------------------------