बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून भावाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 05:03 PM2022-10-31T17:03:22+5:302022-10-31T17:05:05+5:30
मागील काही वर्षांपासूनच्या नापिकीपीमुळे कर्ज फेडता येत नव्हते.
केज (बीड) : गत तीन वर्षापासून शेतीच्या नापिकीमुळे बहिणीच्या लग्नाचे कर्ज फेडावे कसे? या चिंतेने भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील देवगाव येथे रविवारी घडली. दीपक बालासाहेब मुंडे असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील देवगाव येथील बालासाहेब मुंडे यांच्यावर शेतीसाठीचे बँकेचे कर्ज आणि मुलीच्या लग्नासाठी घेतलेले खाजगी कर्ज होते. मात्र, मागील काही वर्षांपासून सततच्या नापिकीपीमुळे कर्ज फेडता येत नव्हते. यातून बाळासाहेब शिंदे यांचा २० वर्षीय मुलगा दीपक चिंतेत असे. कर्ज कसे फेडणार या विवंचनेत दिपकने रविवारी ( दि. ३१) दुपारी २:०० वाजेच्या सुमारास घरातील पत्र्याच्या अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी पांडुरंग रामा मुंडे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्र. ६/२०२२ फौजदारी गुन्हे प्रक्रिया संहिता १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी सहाय्य पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरघाट दूरस्थ पोलिस चौकीतील हेडकॉन्स्टेबल अभिमान भालेराव हे पुढील तपास करीत आहेत.