टूलकिट देशद्रोह कसा; पर्यावरणप्रेमींचे शंतनू, दिशा, निकितावरील गुन्हा मागे घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 12:26 PM2021-02-19T12:26:54+5:302021-02-19T12:29:12+5:30
Toolkit Controversy पर्यावरणप्रेमी शंतनू मुळूक, दिशा रवी व निकिता हे उच्चशिक्षित, नि:स्वार्थ व मानवतेच्या अस्तित्वासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी वाहून घेतलेले कार्यकर्ते आहेत.
बीड : पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारे शंतनू मुळूक, दिशा रवी आणि ॲड. निकिता यांच्यावरील आरोप व गुन्हे केंद्र सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी बीड जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी पंतप्रधान व देशाचे गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. गुरुवारी हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
टूलकिटप्रकरणी बीड येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते शंतनू मुळूक व त्यांच्यासह इतरांवर द्वेषभावनेतून केंद्र सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. ते मागे घ्यावेत, यासाठी बीड जिल्हा पर्यावरणप्रेमींच्या वतीने पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले. सोशल नेटवर्किंग टूलचा वापर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने होत आहे. याच टूलकिटचा वापर शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी केला गेला असेल, तर तो देशद्रोह कसा? असे निवेदनात नमूद केले. जर एखाद्या कायद्याने अथवा निर्णयामुळे देशातील, शांतता, एकता, स्थिरता संकटात येत असेल, तर त्या निर्णयापेक्षा लोकांचे हित व देशाची अखंडता महत्त्वाची आहे.
पर्यावरणप्रेमी शंतनू मुळूक, दिशा रवी व निकिता हे उच्चशिक्षित, नि:स्वार्थ व मानवतेच्या अस्तित्वासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी वाहून घेतलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, असे निवेदन बीड जिल्हा पर्यावरणप्रेमींच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. यावेळी अभिमान खरसाडे, पर्यावरण तज्ज्ञ प्रा. मोहन परजणे, निसर्गप्रेमी राजकुमार कदम व कुणाल नाईकनवरे यांची उपस्थिती होती.