सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:34 AM2021-08-15T04:34:38+5:302021-08-15T04:34:38+5:30
बीड : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, अशी ...
बीड : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, अशी चिंता सर्वांना लागली आहे. निकालाची टक्केवारी वाढल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश देणे कसरतीचे ठरणार आहे. मोठ्या शहरातील महाविद्यालयांच्याबाबतीत ही कसरत असलीतरी बीड जिल्ह्यात मात्र दोन-चार महाविद्यालये वगळलीतर विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात अकरावीत प्रवेश मिळू शकणार आहे. बीड जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनांची २६८ महाविद्यालये आहेत. यंदा दहावीचा निकाल विक्रमी लागला आहे. यातच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना ८५ ते ९५ टक्क्यांपर्यंत गुण मिळाले आहेत.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ४०,५२२
अकरावीची प्रवेशक्षमता - ४४, ६४०
कोणत्या शाखेत किती जागा
कला - २२,५६०
वाणिज्य - १७६०
विज्ञान - १७,७६०
३) महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार
मूल्यमापनात गुणवत्तेचा फुगवटा मोठा असल्याने ९० ते ९९ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेताना अडचणी येणार नाहीत. ८० ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील जास्त आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयात जागा कमी असतील तेथे प्रवेश देताना अडचणी येऊ शकतात. जिल्ह्यात मात्र फारसा फरक पडणार नसल्याची स्थिती आहे.
४) आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्देशांची
अकरावीत प्रवेशासाठी सीईटी न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेशासाठी त्या त्या महाविद्यालयांना स्वतंत्र सीईटी घेण्याशिवाय पर्याय नाही. खरी कसरत अशा महाविद्यालयांना करावी लागेल आणि प्रवेश मेरिटवर दिले आहेत हे सिद्ध करावे लागेल. बाकी महाविद्यालयांत फारशा नियमांचे फिल्टर न लावता प्रवेश देणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनहिताचे ठरेल.
- विवेक मिरगणे, प्राचार्य, बंकटस्वामी महाविद्यालय, बीड
---------
न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाकडून अकरावीच्या प्रवेशासंबंधी मार्गदर्शक सूचनांबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित होणार आहेत. नेहमीप्रमाणे अकरावीचे प्रवेश गुणवत्तेवर द्यावे लागतील. दहावीचा निकालातील गुणवत्तेच्या फुगवट्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, याची शाश्वती नाही. बीड जिल्ह्यात मात्र पसंतीचे कॉलेज मिळू शकेल, त्याचबरोबर तुकड्यादेखील वाढवाव्या लागण्याची शक्यता वाटते.
- वसंत सानप, प्राचार्य, बलभीम महाविद्यालय, बीड
------------
विद्यार्थी चिंतित
अकरावी प्रवेशासाठी मी अर्ज भरला होता. तयारीदेखील सुरू केली होती. पण सीईटी रद्द झाली. मला बीड शहरातील महाविद्यालयात ११वी विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला आहे. कोणतीही अडचण आली नाही. प्रवेशाबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.
- समृद्धी नरेंद्र कुलकर्णी, बीड
------------
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावीसाठी सीईटीची तयारी सुरू केली होती. खरे तर सीईटी व्हायला हवी होती. ती रद्द झाल्याने बीडमधील कॉलेजमध्ये प्रवेशासाठी नोंदणी केली. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणार आहे. प्रवेशासाठी कुठलीही अडचण आली नाही.
- सुनील गणेश घोरपडे, बीड
-----------