CoronaVirus : शस्त्राविना लढाई जिंकायची कशी ? एन-९५ मास्कच्या तुटवडयाने डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 08:45 PM2020-03-28T20:45:50+5:302020-03-28T20:46:21+5:30
आव्हान पेलताना शासनाने डॉक्टरांना सर्व वैद्यकीय सेवा व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.मात्र अशा स्थितीत ही रुग्णालयात अत्यावश्यक असलेल्या एन-९५ मास्क चा मोठा तुटवडा आहे.
- अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई-: कोरोना विरुद्ध ची लढाई जिंकायची असेल तर आधी डॉक्टरांमध्ये सुरक्षितता निर्माण करून त्यांना सर्व वैद्यकीय सेवा,सुविधा अत्यावश्यक आहेत.या उपचार पद्धतीत महत्वपूर्ण भाग ठरलेल्या एन-९५ मास्कचा तुटवडा निर्माण झाल्याने शस्त्रा विना लढाई लढायची कशी?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंबाजोगाई चे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय हे सामान्य रुग्णांचे आधारस्थान असल्याने येथे रुग्णांची मोठी गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले आहे.कोरोनाचा स्वतंत्र कक्ष रुग्णालयात स्थापन करण्यात आला आहे. कोरोना चा संसर्ग रोखणे हे वैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे आव्हान आहे.मात्र हे आव्हान पेलताना शासनाने डॉक्टरांना सर्व वैद्यकीय सेवा व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.मात्र अशा स्थितीत ही रुग्णालयात अत्यावश्यक असलेल्या एन-९५ मास्क चा मोठा तुटवडा आहे.जिथे दोन ते पाच हजार मास्क ची आवश्यकता आहे तिथे फक्त ५५मास्क उपलब्ध आहेत.रुग्णालयात रुगणांची तपासणी दैनंदिन सुरू आहे.यात संसर्ग कोणाला?हे अद्याप समोर आले नसले तरी दररोज शेकडो रुग्ण डॉक्टरांना तपासावे लागतात.त्यांना स्वतः च्या संरक्षणासाठी एन-९५मास्क व सॅनिटायझर या महत्वपूर्ण बाबी आहेत.मात्र साध्या कापडी मास्क चा वापर करत आपला जीव धोक्यात घालुन डॉक्टर अशा स्थितीत ही काम करत आहेत.
शासकीय रुग्णालयातच जर मास्क चा तुटवडा जाणवत असेल तर खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या कर्मचारी यांना एन-९५मास्क कधी उपलब्ध होणार? असुरक्षिततेची भावना मनात ठेवून रुग्णसेवा कशी करायची? असा सवाल अनेक डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.
स्वाराती रुग्णालयात सध्या फक्त ५५एन-९५ मास्क उपलब्ध आहेत.हे मास्क बाजारात ही उपलब्ध होत नाहीत.या मास्क ची मागणी प्रशासना कडे करण्यात आली आहे.ते लवकर उपलब्ध होतील.अशी माहिती स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी लोकमत'शी बोलताना दिली.