एचआरसीटी स्कोअर २४, ऑक्सिजन लेव्हल ५०, तरीही वृद्धाची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:51+5:302021-06-19T04:22:51+5:30
पॉझिटिव्ह स्टोरी सोमनाथ खताळ बीड : एचआरसीटी स्कोअर २४, ऑक्सिजन लेव्हल ५० वर आली. कोमॉर्बिड आजार असल्याने मनात भीती; ...
पॉझिटिव्ह स्टोरी
सोमनाथ खताळ
बीड : एचआरसीटी स्कोअर २४, ऑक्सिजन लेव्हल ५० वर आली. कोमॉर्बिड आजार असल्याने मनात भीती; परंतु रुग्णाची जिद्द आणि आरोग्यकर्मींच्या परिश्रमांच्या बळावर ७२ वर्षीय वृद्धाने कोरोनावर मात केली. ३७ दिवस उपचार घेऊन ३८ व्या दिवशी वृद्धाला सुटी देण्यात आली. हे समजताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी वॉर्डात जाऊन वृद्ध व रुग्णसेवा देणाऱ्यांचे स्वागत केले. यामुळे सरकारी रुग्णालयाबद्दल विश्वास निर्माण झाला असून, आरोग्यकर्मींचे मनोबलही उंचावले आहे.
बीड तालुक्यातील घोडका राजुरी येथील ७२ वर्षीय वृद्धाला लक्षणे असल्याने ९ मे रोजी कोरोना चाचणी केली. १० मे रोजी ते पॉझिटिव्ह असल्याचे समजले. अगोदरच दमा असल्याने नातेवाईक घाबरले. तपासणी केली असता एचआरसीटी स्कोअर २४ आला, तर ऑक्सिजन लेव्हलही ५० होती. या कठीण परिस्थितीतही डॉक्टरांनी परिश्रम घेणे सोडले नाही, तर या वृद्धानेही घाबरून न जाता जिद्दीने कोरोनाचा सामना केला. उपचारादरम्यान त्यांना बायपॅप आणि चार रक्ताच्या पिशव्या लागल्या. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. अखेर ३७ दिवस उपचार घेऊन हे वृद्ध शुक्रवारी कोरोनामुक्त झाले. त्यांचे स्वागत करून जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे सरकारी रुग्णालयातही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उपचार मिळत असल्याचा संदेश समाजात गेला आहे.
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वागत
रुग्ण गंभीर असतानाही त्याच्यावर योग्य उपचार आणि काळजी घेत त्याला नवे जीवन दिले म्हणून उपचार करणाऱ्या सर्वच डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉयचे स्वागत करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे वॉर्डात पोहोचले. अगोदर कोरोनामुक्त झालेल्या वृद्धाचा पुष्पगुच्छ देऊन व नंतर उपचार करणाऱ्या सर्वांचेच फूल देऊन स्वागत केले.
या टीमने केले उपचार
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुरेश साबळे, डॉ. सुखदेव राठोड, डॉ. आय.व्ही. शिंदे, डॉ. अशोक हुबेकर, डॉ. सचिन आंधळकर, मेट्रन रमा गिरी, संगीता दिंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिशियन डॉ. रेवडकर, डॉ. भरत दुरगुडे, डॉ. स्वप्नील बडजाते, डॉ. बाळासाहेब टाक, डॉ. विशाल कोटेचा, डॉ. रूपाली बंड, वॉर्ड इन्चार्ज कुडके, परिचारिका मीरा मुंडे, स्वप्नाली तळेकर, अश्विनी सावंत, प्रियंका जाधव, आकाश भोसले, कविता लाड, प्रियंका शेळके, राजकन्या देवकुळे, राजपूत, खरमाटे यांनी ३७ दिवस उपचार करून वृद्धाला कोरोनामुक्त करून घरी पाठविले.
--
जिल्हा रुग्णालयात गुणवत्तापूर्ण व वेळेत उपचार होतात. ७२ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात करून आमच्या परिश्रमाची पावती दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारी यंत्रणेबद्दलच गैरसमज दूर करून उपचार घ्यावेत. ही बाब कौतुकास्पद असल्याने सर्वांचेच स्वागत वाॅर्डात जाऊन केले. मला माझ्या टीमचा अभिमान वाटत आहे. यापुढेही अशीच रुग्णसेवा होत राहील.
-डाॅ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
===Photopath===
180621\18_2_bed_6_18062021_14.jpeg
===Caption===
कोरोनामुक्त झालेल्या वृद्धाचे स्वागत करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे. सोबत डॉ.सचिन आंधळकर, डॉ.विशाल कोटेचा, डॉ.रूपाली बंड, गणेश पवार, नवले, परिचारीका, कर्मचारी दिसत आहेत.