मांडवा गावाजवळील जंगलात भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:19 AM2021-03-29T04:19:45+5:302021-03-29T04:19:45+5:30
: वनविभागासोबतच नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरापासून अवघ्या दहा ते अकरा किमी अंतरावर असलेल्या मांडवा ...
: वनविभागासोबतच नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरापासून अवघ्या दहा ते अकरा किमी अंतरावर असलेल्या मांडवा गावाजवळील वाण नदीच्या किनाऱ्यावरील डोंगरावरील जंगलास २७ मार्च रोजी दुपारी अचानक आग लागली. या आगीच्या वणव्यात १० हेक्टर डोंगर जळून खाक झाला असल्याची माहिती वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राउंड फायर पद्धतीचा उपयोग करून ही आग आटोक्यात आणली असल्याचे भगवान गित्ते यांनी सांगितले.
२७ मार्च रोजी दुपारी मांडवा गावाजवळील वान नदीच्या एका डोंगर उतारावर ही आग लागली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी अंबाजोगाई, परळी क्षेत्रातील वन विभागातील कर्मचाऱ्यांना ताबडतोब एकत्र बोलावून आणि मांडवा ग्रामस्थांच्या सहकार्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही आग डोंगर उतारावरील एका दरीत लागली असल्याचे सांगण्यात आले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी फायर गाड्यांचा उपयोग करण्यात आला.
वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राउंड फायर पद्धतीचा उपयोग करून ही आग आटोक्यात आणली असल्याचे भगवान गित्ते यांनी सांगितले.
१० हेक्टर डोंगर जळाला
या आगीत डोंगर दरीतील १० हेक्टर भागातील गवत व पालापाचोळा जळून खाक झाला. या क्षेत्रात कसल्याही प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली नसल्यामुळे मोठी हानी टळल्याचे वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राउंड फायर पद्धतीचा उपयोग करून ही आग आटोक्यात आणली असल्याचे भगवान गित्ते यांनी सांगितले.
वनअधिकारी, नागरिकांनी दक्षता बाळगावी
दरम्यान अशा बाबतीत वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी अधिकची दक्षता बाळगावी असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांनी केले आहे.
फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात नंतर जून महिन्याच्या शेवटपर्यंत असा वणवा लागण्याची शक्यता असते. वणवा हा तीव्र उष्णतेने लागू शकतो. बऱ्याचदा वणवा मानवाच्या निष्काळजीपणामुळे सुद्धा लागतो. जंगलात सुकलेल्या पानांचा जाळ करताना व काही लोक नवीन चांगले गवत उगवावे म्हणून शिवार आणि सुकलेल्या जमिनीचा काही पट्टा पेटवून देतात. मधाचे पोळे जाळताना आगीचा उपयोग सुद्धा वणव्याला निमंत्रण देते. वृक्षारोपणाबरोबरच अपघात टाळणेही महत्त्वाचे आहे. वनविभागाच्या मालकीच्या जागेत असणाऱ्या वनराईच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी याबाबत विशेष दक्षता व काळजी घेणे आवश्यक आहे असे अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांनी सांगितले.