चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात माजलगावकर उतरले रस्त्यावर; आरोपीस फाशी देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 03:40 PM2024-10-07T15:40:44+5:302024-10-07T15:43:04+5:30
माजलगाव शहर कडकडीत बंद; विद्यार्थी, महिलांचा मोर्चात मोठ्या प्रमाणावर समावेश
माजलगाव ( बीड) : एका खाजगी विद्यालयातील शिक्षकाने साडेपाच वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना शहरात उघडकीस आली असून पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत हे प्रकरण चालून शिक्षकाला तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी करत संतप्त माजलगावकर आज सकाळी रस्त्यावर उतरले. माजलगाव शहर कडकडीत बंद ठेवून जुन्या शहरातील हनुमान चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या भव्य मोर्चात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.
शहराला लागून असलेल्या एका खाजगी विद्यालयात साडेपाच वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने ओळखल्यानंतर याच शाळेतील शिक्षक राहुल अंबादास वायखिंडे यास शनिवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणानेमुळे माजलगावकरांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आहे. यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशी देण्यात यावी या मागणीसाठी आज माजलगाव बंदची हाक देण्यात आली होती. आज सकाळीपासूनच शहरातील व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला. दरम्यान, जुन्या शहरातील हनुमान चौकातून तहसील कार्यालयावर नागरिकांनी भव्य मोर्चा काढला. येथील उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन यावेळी विद्यार्थ्यांच्या हाताने देण्यात आले. मोर्चात शहरातील अनेक शाळेमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना, व्यापारी, सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
संस्था चालकावर गुन्हा नोंदवा
हा मोर्चा एवढा मोठा होता की , पहिली व्यक्ती तहसील कार्यालयात असताना शेवटची व्यक्ती हनुमान चौकात दिसून आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चा निघण्याची ही माजलगावच्या इतिहासातील पहिलीच वेळ दिसून आली. त्याचबरोबर माजलगाव शहर कडकडीत बंद असल्यामुळे कोठे पाणी देखील मिळणे मुश्किल झाले होते. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चेकर्यांनी ज्या शाळेतील हा शिक्षक आहे त्या शाळेच्या संस्थाचालकांना सह आरोपी करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावे अशी मागणी देखील करण्यात आली.