बीड जिल्ह्यामध्ये तब्बल ८१ अपक्ष उमेदवार रिंगणात, कोणत्या मतदारसंघात किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 06:54 PM2024-11-07T18:54:30+5:302024-11-07T18:56:27+5:30

प्रमुख बंडखोरांसह महायुती, आघाडीच्या उमेदवारांचे गणित बिघडवणार

Hum bhi kisi se kam nahin; 81 independent candidates in the fray in Beed district, major candidates have increased headache | बीड जिल्ह्यामध्ये तब्बल ८१ अपक्ष उमेदवार रिंगणात, कोणत्या मतदारसंघात किती?

बीड जिल्ह्यामध्ये तब्बल ८१ अपक्ष उमेदवार रिंगणात, कोणत्या मतदारसंघात किती?

बीड : जिल्ह्यात यावेळी विधानसभा निवडणुकीत तब्बल १३९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये ५८ उमेदवार हे वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत, तर तब्बल ८१ उमेदवार हे ‘हम भी किसी से कम नहीं’ म्हणत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. आता हेच अपक्ष उमेदवार महायुती, महाविकास आघाडीसह प्रमुख बंडखोरांच्या मतांचे गणित बिघडवणार असल्याचे दिसत आहे. आम्हालापण हलक्यात घेऊ नका, असा इशारा या अपक्षांनी पक्षाच्या उमेदवारांना दिला आहे.

जिल्ह्यातील बीड, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि गेवराई या सहा विधानसभा मतदारसंघांत ४०७ उमेदवारांनी ५६६ अर्ज दाखल केले होते. यातील ३० अर्ज हे स्वाक्षरी नसण्यासह इतर कारणांमुळे अवैध ठरले. २३८ जणांनी माघार घेतली असून, आता १३९ जण निवडणूक रिंगणात आहेत. यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परळी आणि केजवगळता इतर ठिकाणी बंडखोरी केली आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारांना याचा फटका बसणार आहे. यासोबतच अपक्ष उमेदवारही काही ठिकाणी मजबूत आहेत. त्यामुळे त्यांनाही हलक्यात घेतल्यास प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी ठरू शकते.

केज, परळीत दुरंगी लढत
केज मतदारसंघात भाजपच्या नमिता मुंदडा आणि शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांच्यात, तर परळीमध्ये अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आणि शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. माजलगावात महायुतीकडून अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे मोहन जगताप रिंगणात आहेत. यासह अपक्ष असलेले रमेश आडसकर, बाबरी मुंडे आणि माधव निर्मळ हेदेखील तुल्यबळ आहेत. गेवराईत तिरंगी लढत होत असून, अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित, ठाकरे गटाचे बदामराव पंडित आणि अपक्ष लक्ष्मण पवार मैदानात आहेत. यासह पूजा मोरे यांच्यासह तीन महिला इतर पक्षांकडून उभे आहेत.

आष्टीत महायुतीचे दोन उमेदवार
आष्टीत महायुतीने दोन उमेदवार दिल्याने मैत्रीपूर्ण लढत झाली आहे. युतीकडून भाजपचे सुरेश धस आणि अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे रिंगणात आहेत. अपक्ष म्हणून भाजपचे बंडखोर भीमराव धोंडे मैदानात आहेत. आघाडीकडून शरद पवार गटाचे महेबूब शेख आहेत.

बीडमध्ये अपक्ष ठरणार डोकेदुखी
बीड मतदारसंघात युतीकडून डॉ. योगेश क्षीरसागर, तर आघाडीकडून संदीप क्षीरसागर मैदानात आहेत. हे दोघेही नात्याने चुलत भाऊ आहेत. यासह तिसऱ्या आघाडीकडून कुंडलिक खांडे आणि अपक्ष म्हणून शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे निवडणूक लढवत आहेत. या दोन अपक्षांसह इतर अपक्ष उमेदवारही प्रमुख उमेदवारांची डाेकेदुखी ठरू शकतात.

बीडमध्ये काका-पुतण्या एकत्र येणार
बीड मतदारसंघात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु शेवटच्या दिवशी जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज मागे घेतल्याने अनेकांना धक्का बसला. आता ते कोणाला पाठिंबा देतात, याकडेही लक्ष आहे. सध्या तरी त्यांनी माझा फोटो कोणीही वापरू नये, असे सोशल मीडियावरून सांगितले आहे. परंतु मंगळवारी जाहीरनामा प्रकाशित केल्यावर डॉ. योगेश यांनी अण्णादेखील लवकरच पिंक कपड्यात दिसतील, असे सुचक विधान करून एकत्रित येण्याचे संकेत दिले. त्यामुळे विरोधातील काका-पुतणे आता एकत्रित येणार असल्याचे दिसत आहे. जर पाठिंबा मिळाला तर डॉ.योगेश यांना याचा मोठा लाभ होऊ शकतो.

मतदारसंघ - अपक्ष - एकूण उमेदवार
गेवराई - १२ - २१
केज - १४ - २५
माजलगाव - २२ - ३४
आष्टी - ९ - १७
परळी - ५ - ११
बीड - १९ - ३१
एकूण - ८१ - १३९

Web Title: Hum bhi kisi se kam nahin; 81 independent candidates in the fray in Beed district, major candidates have increased headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.