मानवी शरीरात संतुलित हार्मोन्सची आवश्यकता गरजेची - A - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:20+5:302021-07-22T04:21:20+5:30
बीड : आपल्या शरीरात पन्नासहून अधिक हार्मोन्स असतात. या हार्मोन्सचा रक्तामध्ये स्राव किती करायचा, याचे नियंत्रण मेंदूच्या एक छोट्या ...
बीड : आपल्या शरीरात पन्नासहून अधिक हार्मोन्स असतात. या हार्मोन्सचा रक्तामध्ये स्राव किती करायचा, याचे नियंत्रण मेंदूच्या एक छोट्या ग्रंथीमध्ये असते, ज्याला पिट्युटरी ग्रंथी म्हटले जाते. आपल्या शरीरातील प्रत्येक हालचालीला या ग्रंथी व हार्मोन्स जबाबदार असतात, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. राजेश ढेरे यांनी केले.
बलभीम महाविद्यालय, र. भ. अट्टल महाविद्यालय व सुंदरराव सोळंके महाविद्यालय येथील प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जुलै रोजी ‘एंडोक्राइनालाॅजी-मानवी शरीराचे रासायनिक नियंत्रण आणि समन्वय जाळे’ या विषयावर ऑनलाईन विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सानप, उपप्राचार्य डाॅ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
डाॅ. ढेरे म्हणाले की, अधिक किंवा कमी प्रमाणात हे हार्मोन्स आपल्या शरीरात किंवा रक्तात असल्यास अनेक आजारांना सामोरे जावे लागते. जर बौद्धिकरण नावाचा आजार आहे त्या तुलनेत ग्रोथ हार्मोन कमी प्रमाणात स्राव होत असेल तर त्यामध्ये हाडे आणि स्नायूंची वाढ थांबते आणि माणसाची उंची कमी राहते आणि जर हा संप्रेरक अधिक मात्रेमध्ये स्राव झाला तर माणसाची उंची खूप अधिक प्रमाणात वाढते. असेच प्रत्येक हार्मोनचे एक प्रमाणामध्ये रक्तात स्राव होणे गरजेचे आहे. तुम्हांला भूक लागते, राग येतो, भीती वाटते, त्याचा पण हार्मोन आहे. उदाहरणार्थ आपण एखादी गोष्ट साध्य केली तर आपल्याला आनंद होतो, आनंद होण्यासाठी पण एक हॉर्मोन आहे. त्याला एन्डोरफीन म्हणतात. विचार करा की, हा हॉर्मोन तुमच्या शरीरात खूप कमी प्रमाणात आहे आणि अशा वेळेस तुम्ही कितीही मोठे ध्येय गाठले तरी तुम्हाला आनंद मिळणार नाही. कारण आनंद देणारा हार्मोन तुमच्या शरीरामध्ये कमी प्रमाणात आहे. शरीरातील हॉर्मोनची मात्रा प्रमाणात कशी ठेवायची आणि त्याचे उपाय हे डॉ. ढेरे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलभीम महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रमोद रोकडे यांनी केले. डॉ. वर्षा जयसिंगपुरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. आर. टी. पवार यांनी आभार मानले. व्याख्यानाला प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.