बीडमध्ये रक्तदान आंदोलनातून माणुसकीचे नाते घट्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:49 PM2018-08-07T23:49:40+5:302018-08-07T23:50:05+5:30
बीड : मराठा आरक्षणासाठी परळीत २१ दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू असून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर शासनाच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.
मंगळवारी उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे व तहसीलदार शरद झाडके यांनी सायंकाळी आंदोलकांशी संवाद साधला. धारूर तालुक्यात रास्ता रोको आंदोलनावेळी आलेल्या रूग्णवाहिकेला आंदोलकांनी रस्ता मोकळा केला. दरम्यान केज, माजलगाव आणि गेवराईत ठिय्या आंदोलन सुरूच होते. ग्रामीण भागातून दुचाकी रॅली तालुक्याच्या ठिकाणापर्यंत काढण्यात आल्या. तर आरक्षणासाठी केलेल्या रक्तदान आंदोलनात बीड, केज, गेवराई आणि माजलगावात जवळपास ७०० जणांनी उत्स्फूर्त रक्तदान करत माणुसकीचे नाते घट्ट केले.
बीडमध्ये ३७५ जणांचे रक्तदान
बीड : मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी बीडमध्ये मंगळवारी नियाजनाप्रमाणे उत्स्फूर्त रक्तदान आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैद्यकीय क्षेत्रातील सकल मराठा समाजाने ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. मराठा डॉक्टर, औषध विक्रेते, औषध कंपनीचे प्रतिनिधी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामाजिक न्याय भवनात सायंकाळपर्यंत ४०० आंदोलकांनी स्वत: नोंदणी करून रक्तदान केले. रक्तदानासाठी नोंदणीपासून पूर्वतपासणी व इतर पूरक मदत तसेच रक्त संकलनासाठी जिल्हा रूग्णालयाच्या जीवन अमृत रक्तपेढी व रूग्णालयातील ४० कर्मचाºयांचा ताफा सज्ज होता. त्यांना आंदोलकांच्या वतीने सहकार्य करण्यात येत होते. त्यामुळे विनाअडथळा रक्तदान आंदोलन पार पडले.
केजमध्ये पाचव्या दिवशीही ठिय्या
केज : केजमध्ये पाचव्या दिवशीच्या ठिय्या आंदोलनात तालुक्यातील लहुरी व पैठण येथील सकल मराठा समाजाने टाळ मृदंगाच्या गजरात गावापासून आंदोलन स्थळापर्यंत रॅली व मोर्चा काढून ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली. शहरातून ठिय्या एक मराठा लाख मराठा व इतर घोषणांनी वातावरण दणाणले.
६८ जणांचे रक्तदान
मंगळवारी केज येथे आंदोलनस्थळी रक्तदानासाठी १५० मराठा युवकांनी नोंद केली होती. संकलनाच्या बॅगच्या कमतरतेमुळे ६८ जणांनाच रक्तदान करता आले. एकावेळी दोघांना रक्तदान करता येईल याची व्यवस्था करण्यात आली होती. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयाचे डॉ. डाके व रक्तपेढीच्या टीमने रक्तसंकलन केले.
जातेगाव, तलवाडा येथून रॅली आंदोलनस्थळी
गेवराई : आरक्षणाच्या मागणीसाठी येथील सकल मराठा क्र ांती ठोक मोर्चाच्या वतीने पाच दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी दिवसभरात २०० जणांनी रक्तदान केले. रक्तदान आंदोलनात एका वेळेला ३ जणांचे रक्तदान होत होते. मंगळवारी दुपारी आंदोलन स्थळी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तर तालुक्यातील जातेगांव, रेवकी, तलवाडा,पांढरवाडी इ. गावांतील तरूणांनी गेवराईतील आंदोलन स्थळापर्यंत शंभरपेक्षा जास्त दुचाकी व रिक्षाची रॅली काढून ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. पांढरवाडी येथील शेकडो महिलांनी मुला-बाळांसह शेकडो महिला रॅली काढून ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या.
माजलगावला रक्तदान, जागरण गोंधळ
माजलगाव : मराठा आरक्षणप्रश्नी येथील तहसील कार्यालयामोर सातव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच आहे. मंगळवारी रक्तदान आंदोलनात दुपारपर्यंत ५१ तरूणांनी सहभाग नोंदविला. शहरातील सर्व मराठा डॉक्टर आंदोलनस्थळी उपस्थित होते. सकाळपासून जागरण गोंधळ, पोवाड्याचे कार्यक्र म पार पडले. दररोज विविध गावचे मराठा समाजातील नागरिक यात सहभागी होत आहेत तर विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.