मानवलोकने मदतीतून माणुसकी जोपासली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:39 AM2021-09-14T04:39:35+5:302021-09-14T04:39:35+5:30
अंबाजोगाई : आपत्ती व्यवस्थापन व मदत कशी करावी? याचा आदर्श मानवलोकने समाजासमोर ठेवला आहे. स्व. डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या ...
अंबाजोगाई : आपत्ती व्यवस्थापन व मदत कशी करावी? याचा आदर्श मानवलोकने समाजासमोर ठेवला आहे. स्व. डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या कार्याचा समृद्ध वारसा अनिकेत लोहिया पुढे जोपासत आहेत, असे गौरवोद्गार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी काढले.
मंगळवारी डाॅ. द्वारकादास लोहिया (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवलोकचे अध्यक्ष अशोकराव देशमुख होते. व्यासपीठावर मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. अरुंधती लोहिया, प्राचार्य प्रकाश जाधव उपस्थित होते.
या वेळी समाज विज्ञान महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये समाजकार्य विषयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पहिले पाच क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कुलगुरू यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोनात कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना प्रत्येक ३० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य २८ कुटुंबांना देण्यात आले. मनस्विनी महिला प्रकल्पाअंतर्गत ४ मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल देण्यात आले. तर कोरडवाहू फळबाग विकास कार्यक्रमातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. प्रास्ताविक मानवलोकचे अनिकेत लोहिया यांनी केले. सूत्रसंचालन डाॅ. रमा पांडे यांनी केले.
------
औषधी वनस्पती लागवडीसाठी मदत करणार
चौकटीच्या पुढे जाऊन प्राचार्य व प्राध्यापकांनी काम केले पाहिजे. स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे लोटली तरी प्रश्न व समस्या त्याच आहेत. या समस्यांची उकल करण्यासाठी शिक्षण व संशोधनाचा उपयोग झाला पाहिजे. मानवलोकला औषधी वनस्पती लागवड योजनेसाठी विद्यापीठ मदत करेल, असे आश्वासन या वेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले.
-------