नशिबाच्या थट्टेवर माणुसकीची मात - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:34 AM2021-04-20T04:34:31+5:302021-04-20T04:34:31+5:30
गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव मुळेगाव बंद, बाजार, दुकान, शाळा, जत्रा, उरूस बंद. जगायचं कसं सगळ्यांनाच पडलेला प्रश्न. जत्रा, ...
गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव मुळेगाव बंद, बाजार, दुकान, शाळा, जत्रा, उरूस बंद. जगायचं कसं सगळ्यांनाच पडलेला प्रश्न. जत्रा, उरूस, तमाशा, सप्ताह, नाटक यावर पोट भरणारी गावकलाकार मंडळी हतबल झाली आहेत. खायला अन्न तर लागतंय, पण आणायचे कोठून, हा प्रश्न आहे. कुटुंबातील तरणीताठी माणसं काहीतरी करून कसा तरी आपला उदरनिर्वाह भागवत आहेत, परंतु ज्या कुटुंबात चार माणस संपूर्ण दृष्टिहीन आहेत, त्यांनी काय करायचे. या काळात न्याय कुणाला मागावा, हा त्यांच्यासमोर प्रश्न उभा आहे. उपासमारीची पाळी आलेल्या साक्षाळपिंपरी येथील कुटुंबाला संघर्ष धान्य बॅंकेच्या वतीने धान्याची मदत करण्यात आली.
साक्षाळपिंपरी येथील क्षीरसागर कुटुंबात एकूण सहा माणसे होती. सहाची सहा माणसे जन्मताच अंध आहेत. मागील एक वर्षाच्या कालावधीत या कुटुंबातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाला. आता चार व्यक्ती या कुटुंबात आहेत. ही सर्व मंडळी गावातील जत्रा, उरूस, सप्ताह अशा ठिकाणी जाऊन आपली कला सादर करायची. यात काही जण गायन करतात, तर काही उत्तम संगीत साथ देतात. त्यांची कला पाहून जत्रेतील लोकांकडून मिळणाऱ्या मदतीवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा, परंतु आता हे सर्व बंद झाले आहे. एक वर्षापासून या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. संघर्ष धान्य बँकेने आजपर्यंत या कुटुंबाला कठीण प्रसंगात पाच वेळा धान्य व किराणा पुरविलेले आहे. त्यामुळे संकट काळात क्षीरसागर कुटुंबाला आठवण आली. संघर्ष धान्य बँकेचे सुभाष काळे यांना सम्राट क्षीरसागर याने फोन करून ‘आमच्याकडे थोडे लक्ष द्या, आम्ही खूप बिकट अवस्थेत जगत आहोत. आमचे खाण्यापिण्याचे वांदे झाले आहे. कृपया संघर्ष धान्य बँकेतून आम्हाला मदत करा, अशी विनवणी केली’. सुभाष काळे यांनी त्यांना मदतीचे वचन देत मादळमोही येथे संघर्ष धान्य बँकेच्या शाखेतून दोन क्विंटल धान्य रविवारी देण्यात आले. याप्रसंगी संघर्ष धान्य बँकेचे सुरेश भोपळे, सुभाष काळे, बाळासाहेब गावडे, माउली तळेकर, मारुफ शेख, शिवाजी झेंडेकर, संजय पांढरे, धर्मराज करपे, सुरेश नवले, संजीवनी भोपळे, सुवर्णा भोपळे इत्यादी उपस्थित होते. संघर्ष धान्य बँकेत धान्य जमा करणारे दातेच आमच्यासाठी खरे परमेश्वराचे अवतार आहेत, अशी प्रतिक्रिया सम्राट क्षीरसागर यांनी व्यक्त केली, तर ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे,’ या म्हणीचा प्रत्यय संघर्ष धान्य बँकेमुळे जिल्ह्यात येत आहे.
===Photopath===
180421\2950sakharam shinde_img-20210418-wa0022_14.jpg