बनावट कृषी योजनेआडून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक, सायबर सेलने ठोकल्या तिघांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 03:13 PM2021-12-21T15:13:44+5:302021-12-21T15:16:50+5:30

आपले सरकार सेवा केंद्रचालकांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेत पैसे उकळले

Hundreds of farmers cheated under fake agriculture scheme, three arrested by cyber cell | बनावट कृषी योजनेआडून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक, सायबर सेलने ठोकल्या तिघांना बेड्या

बनावट कृषी योजनेआडून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक, सायबर सेलने ठोकल्या तिघांना बेड्या

googlenewsNext

बीड : महाराष्ट्र जलसंजीवनी सौरऊर्जा कृषिपंप योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या त्रिकूटाला येथील सायबर सेलच्या पथकाने बेड्या ठोकल्या. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. शेतकऱ्यांना गंडविण्यासाठी आरोपींनी हायटेक प्रणालीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. बीडसहऔरंगाबाद येथील शेकडो शेतकरी त्यांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती पुढे आली आहे.

किशोर विठ्ठल काळे (२८, रा. आपेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), रोहिदास रामलाल कुसळकर (५२, रा. पैठणरोड नक्षत्रवाडी, औरंगाबाद) व संदीप लक्ष्मण गायकवाड (२८, रा. औरंगपूरवाडी, ता. पैठण, जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. बाळासाहेब विनायक जाधव (रा. बनसारोळा, ता. केज) यांनी सप्टेंबर महिन्यात युसूफवडगाव ठाण्यात महाराष्ट्र जलसंजीवनी सौरऊर्जा कृषिपंप योजनेच्या नावाखाली २ लाख ८२ हजार ४९२ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आपले सरकार सेवा केंद्राच्या दोन संचालकांविरुद्ध दिली होती. यावरून फसवणूक व आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा सायबर सेलकडे वर्ग झाला. 

पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी बनावट शासकीय योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला तेव्हा आपले सरकार सेवा केंद्रचालकांना अंधारात ठेवून त्यांच्या करवी शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेत पैसे उकळल्याचे समोर आले. त्यानंतर तांत्रिक तपासाआधारे किशोर काळेला श्रीरामपूर येथून रविवारी रात्री अटक केली तर रोहिदास कुसळकर व संदीप गायकवाड यांना त्यांच्या घरातून बेड्या ठोकण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील आवसगाव, केज, गेवराई व औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर व सिल्लोड परिसरातील जवळपास ९०० शेतकऱ्यांना त्यांनी गंडविल्याचे सूत्रांनी सांगितले.

चार दिवसांची पोलीस कोठडी
तिन्ही आरोपींना सोमवारी केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Hundreds of farmers cheated under fake agriculture scheme, three arrested by cyber cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.