महामार्गाच्या ढिसाळ कामाने शेकडो लोकांचे बळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:38 AM2021-09-12T04:38:44+5:302021-09-12T04:38:44+5:30
विशाल शिंदे/ लोकमत न्यूज नेटवर्क नेकनूर : गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी या महामार्गाचे काम एचपीएम कंपनीमार्फत सुरू ...
विशाल शिंदे/
लोकमत न्यूज नेटवर्क
नेकनूर : गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी या महामार्गाचे काम एचपीएम कंपनीमार्फत सुरू आहे. कंपनीने नेमलेल्या कंत्राटदाराच्या कामाची गती पाहता हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून २ ते ३ वर्षे लागतील असे चित्र आहे. ठेकेदार कंपनीच्या व कंत्राटदाराच्या ढिसाळ कामामुळे या महामार्गावर शेकडो लोकांना जीव गमवावे लागले आहेत. दरम्यान, रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांनी रविवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महामार्गाचे काम चालू असताना रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांना दिशादर्शक फलकही लावण्याची कंत्राटदाराची मानसिकता नाही. यामुळे महामार्गावर शेकडो लोकांचे अपघात झाले आहेत. कित्येक लोकांचे हात, पाय व कितीतरी लोकांनी आपला जीव गमवला आहे. या कामामध्ये प्रशासन का लक्ष घालत नाही? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
....
राजकारणी गप्प का?
सर्वसामान्य लोकांचे जीव जात आहे; पण छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणारे राजकारणी या निकृष्ट रस्त्याच्या कामावर बोलायला का तयार नाहीत. एचपीएम कंपनीवर हे पुढारी इतके मेहेरबान का झाले? सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राजकारणातील सर्व पदाधिकारी गप्प का? असा प्रश्न जनतेतून केला जात आहे.
....
उद्घाटनाआधीच रस्त्याला तडे
ग्रामीण भागातील छोटछोट्या गावांना जोडणारा या महामार्गाचे काम मंजूर होण्याअगोदर लोकांनी खूप हाल सोसले. आता तरी चांगला नवीन रोड मिळेल असे वाटत होते; पण एचपीएम कंपनीचे कंत्राटदारांनी केलेले काम पाहता ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसत आहे. उद्घाटन होण्याअगोदरच आताच तयार झालेल्या रस्त्याला तडे पडले आहेत.
...
जुन्याच पुलाची केली डागडुजी, नाल्यांचे काम अपूर्ण
नेकनूरमधील कालिकादेवी मंदिराजवळील जुन्या पुलाला डागडुजी करून त्यावर काम केलं जातं आहे. या रस्त्याच्या हिशेबाने हा पूल अरुंद होत आहे. नेकनूूरमधील काम चालू होऊन किमान ३ ते ४ वर्षे झाली. तरी रस्त्यालगतच्या नाल्या अजून तशाच आहेत. या अर्धवट कामामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी रोडवरच साचून राहत आहे. या पाण्यात दुचाकीस्वारांच्या गाड्या घसरून अपघात होत आहेत.
....
कंपनीने महामार्गाच्या कामाबाबत ठेकेदारांना सूचना केल्या आहेत. ठेकेदाराकडून कामाला विलंब होत आहे. आता कामाला गती मिळत आहे.
-शिंदे, व्यवस्थापक, एचपीएम कंपनी.
.....
रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने रोज अपघात होत आहे. अनेकांना जीव गमावावा लागला आहे. तरी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
-अरविंद जाधव, सामाजिक कार्यकर्ते., नेकनूर.
...
राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. खड्ड्यांमुळे भविष्यात अपघाताची प्रमाण वाढू शकते. जर काम अशाच पद्धतीने चालू राहिले तर या महामार्गावर बसणारा टोल आम्ही भरणार नाहीत. प्रशासनाने या कामाची चौकशी करावी, अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील.
-जितेंद्र शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य, नेकनूर.
110921\11_2_bed_10_11092021_14.jpg
राष्टमीय महामार्गावर नेकनूर गावाजवळ पडलेला खड्डे.