डोंगराला आग लागल्याने शेकडो झाडे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:30 AM2021-03-14T04:30:00+5:302021-03-14T04:30:00+5:30

बीड : जिल्ह्यात डोंगरपट्ट्यात आग लावण्याचे प्रकार वाढत असून, मागील काही दिवसांत तीन ठिकाणी मोठी आग लागून हजारो वृक्ष ...

Hundreds of trees were burnt to ashes on the mountain fire | डोंगराला आग लागल्याने शेकडो झाडे जळून खाक

डोंगराला आग लागल्याने शेकडो झाडे जळून खाक

बीड : जिल्ह्यात डोंगरपट्ट्यात आग लावण्याचे प्रकार वाढत असून, मागील काही दिवसांत तीन ठिकाणी मोठी आग लागून हजारो वृक्ष जळून खाक झाले आहेत. १३ मार्च रोजी मध्यरात्री बीड तालुक्यातील पिंपरनई येथील डोंगरावर लागलेल्या भीषण आगीत जवळपास १९ हेक्टरवरील सामाजिक वनीकरण विभागाचे वृक्ष लागवडीचे नुकसान झाले असून, मोठ्या प्रमाणात झाडे जळाली आहेत. दरम्यान वृक्ष लागवडीतील भ्रष्टाचार दडपण्यासाठी अशा प्रकारे डोंगरांना आग लावली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

जिल्ह्यात मागील शासनाच्या काळातील वन विभाग, समाजिक वनीकरण व इतर विभागाच्या माध्यमातून ३३ कोटी वृक्ष लागवड या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन करण्यात आले होते. मात्र, या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विधिमंडळात करण्यात आला होता. त्यानुसार या योजनेतील कामांची चौकशी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समितीची स्थापना करण्यात आली आहे.

तर, पिंपरनई येथील डोंगरपट्ट्यावर आग लागल्यानंतर याची माहिती मिळताच सामाजिक वनीकरण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्थानिकांना सोबत घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी उपलब्ध नसल्यामुळे व हवा जास्त असल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. अशाच घटना पाटोदा व धारूर तालुक्यांत देखील झाल्या होत्या. तेथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पंचनामा केला होता. तर, पिंपरनई डोंगरावरील आगप्रकरणी सामाजिक वनीकरण विभागाकडून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आग रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची

शेतकरी पावसाळ्यापूर्वी बांध जाळल्यावर चांगले गवत येते या गैरसमजातून जाळून टाकतात, तसेच काही जण डोंगराला देखील आग लावतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची हानी होते. डोंगरपट्ट्यावर ६ व १२ सीटच्या जाळरेषा काढण्याची आवश्यकता आहे. तसेच डोंगरावर बिडी- सिगारेट ओढून त्याची थोटके टाकली, तर अशा घटना घडू शकतात. मोठ्या जंगलात आग निरीक्षण मनोरा उभारणे गरजेचे आहे. वनविभागाकडून डोंगरपट्ट्यातील गावांत जनजागृती करणे गरजेचे आहे. तर आग लागल्याचे समजताच संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करावा, शेतातील कचरा जाळताना आग पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असे ‌आवाहन वनविभागाने केले आहे.

प्रतिक्रिया

ज्याठिकाणी आगी लागल्या आहेत त्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृतीदेखील केली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार दडपणे वगैरे हे आरोप चुकीचे आहेत.

-मधुकर तेलंग, विभागीय वनाधिकारी, बीड

विभागीय आयुक्तांकडे तक्रार

जिल्ह्यातील डोंगरपट्ट्यावर वारंवार लागत असलेले आग प्रकर संशयास्पद असून, याची उच्चस्तरावरून चौकशी करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री, प्रधान सचिव, तसेच आयुक्त यांच्याकडे तक्रार केल्याचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी सांगितले.

===Photopath===

130321\132_bed_12_13032021_14.jpg

===Caption===

पिंपरनई डोंगरावरील आगीतील वृक्ष 

Web Title: Hundreds of trees were burnt to ashes on the mountain fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.