झोपडीत बसलं तर उपाशी; बाहेर पडलं तर मरणाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:27 AM2018-07-13T00:27:25+5:302018-07-13T00:29:26+5:30
झोपडीत बसलं तर उपाशी आणि बाहेर पडलं तर मरणाची भीती, अशी परिस्थिती आमच्यासमोर सध्या आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं, असा सवाल प्रशासनाला उपस्थित करीत डबडबलेल्या डोळ्यांनी भटक्या समाजातील नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही सकाळीच घराबाहेर पडतोत. मालक लोक (नागरिक) कामासाठी घराबाहेर पडण्याआधीच आम्ही भिक्षुकी करून धान्य, पैसे आणि इतर पदार्थ जमा करतो. याच्यावरच आमचे पोट भरते. परंतु मागच्या काही दिवसांपासून आमच्या वेशभूषेकडे पाहून आम्हाला मुले पळविणारी टोळी समजून मारहाण केली जात आहे. या अफवा वाऱ्यासारख्या राज्यभर पसरल्या. त्यामुळे आता झोपडीबाहेर (घराबाहेर) पडायची सुद्धा भीती वाटत आहे. पायचं चौकटीबाहेर पडत नाही. झोपडीत बसलं तर उपाशी आणि बाहेर पडलं तर मरणाची भीती, अशी परिस्थिती आमच्यासमोर सध्या आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं, असा सवाल प्रशासनाला उपस्थित करीत डबडबलेल्या डोळ्यांनी भटक्या समाजातील नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
मागील काही महिन्यांपासून मुले पळविणारी टोळी समजून भिक्षुकी, भिकारी, भंगारवाले, गोसावी इ. भटक्या समाजातील नागरिकांसह परराज्यातून आलेल्या लोकांना जमावाने मारहाण केली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात दोन तर धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे पाच जणांचा बळी गेला होता. राज्यभरात अनेक लोक या मारहाणीचे बळी ठरले होते. त्यामुळे दारोदारी भटकून पोट भरणाºयांमध्ये भीतीचे वातावरण होते. अगोदरच हलाखीची परिस्थिती असल्याने एका वेळच्या जेवणाची या समाजासमोर पंचाईत असते. अशातच या अफवांचे पेव वाढल्याने त्यांचे जगणेच मुश्कील बनले आहे.
हाच धागा पकडून गुरूवारी बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर अ.भा.बलुतेदार अलुतेदार विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली विविध संघटना, समाजातील नागरिकांनी एकत्र येत मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा नगर रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चा संपल्यानंतर जमलेल्या विविध समाजातील नागरिकांसोबत ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या समस्या पोटतिडकीने मांडल्या. त्यांच्या तोंडून निघणाºया प्रत्येक वाक्यातून त्यांच्या जगण्याचा संघर्ष अन् प्रशासनाबद्दलचा रोषही व्यक्त होत होता.
काय होत्या मागण्या?
धुळे जिल्ह्यातील मारहाणीत मृत्यू झालेल्या गोसावी समाजातील पाचही लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाख रूपयांची मदत द्या.
धुळे प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात दाखल करून आरोपींना फाशीची शिक्षा देऊन मयतांना न्याय द्यावा.
बलुतेदार-भटक्या विमुक्त समाजातील व्यक्तींना शासनाने ओळखपत्र द्यावे, त्यावर त्यांची संपूर्ण माहितीसह त्यांच्या व्यवसायाची नोंद असावी.
बापट आयोगाची अंमलबजावणी करावी.
विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून समाजाला मुख्य प्रवाहात घेण्यासाठी प्रयत्न करावेत.