डोंगराळ भागातील हाॅटेल, ढाब्यांवर मेजवानीसाठी पशुपक्ष्यांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:33 AM2021-07-31T04:33:58+5:302021-07-31T04:33:58+5:30
कडा (जि. बीड) : सध्या चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याने वनराई बहरली असून, जंगलातील झाडे दाट झाली आहेत. पूर्वी राज्य ...
कडा (जि. बीड) : सध्या चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याने वनराई बहरली असून, जंगलातील झाडे दाट झाली आहेत. पूर्वी राज्य महामार्गावरच हाॅटेल, ढाबे दिसायचे; पण आता ग्रामीण भागातील गावोगावी हाॅटेल, ढाबे झाले आहेत. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अनेक ठिकाणी ससे, घोरपड यासह राष्ट्रीय पक्षी मोर, हरणांची शिकार केली जात असून, या गंभीर प्रकाराची दखल घेऊन वनविभागाने स्वतंत्र पथकांच्या माध्यमातून चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी केली आहे.
असे पुरवले जाते जिभेचे चोचले
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ, अंभोरा, कापशी, डोईठाण, चोभानिमगांव, वाघळुज, फत्तेवडगांव यासह अनेक ठिकाणच्या विनापरवाना हाॅटेल, ढाब्यांवर राष्ट्रीय पक्षी मोर, हरीण, ससे, घोरपडीसह अन्य प्राणी व पक्ष्यांची शिकार करून चोचलेबहाद्दर दामदुप्पट पैसे देऊन जिभेचे लाड पुरवत आहेत.
रात्री अचानक तपासणी करावी
आडरानात, डोंगराळ भागात दिवसभर फिरून जाळे लावून गुप्त शिकार करतात व शौकिनांना मोबाइलद्वारे माहिती देऊन रात्रीच्या वेळी चारचौघांत बसून जेवणावर मनसोक्त ताव मारला जात असल्याने या भागातील हाॅटेल, ढाब्यांवर जाऊन गुप्त पध्दतीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी दीपक सोनवणे यांनी केली आहे.
हरीण शिकारप्रकरणी झाले होते गुन्हे दाखल
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी परिसरात हरणांची कातडी सापडली होती. नंतर सोलापूरवाडी येथेही शिकारप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले होते. एवढे होऊनही हाॅटेल, ढाब्यांवर हे रात्रीच्या वेळी प्रकार घडत आहेत. वनविभागाने जनजागृतीसह कारवाईसाठी पुढे यायला हवे, असे प्राणिमित्र नितीन आळकुटे यांनी सांगितले.
गस्त घालणे, तपासणी करणे हे कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असून, तशा सूचना दिल्या आहेत. कुठे शिकार होत असेल अथवा हॉटेल, ढाब्यांची माहिती मिळताच पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल. - श्याम शिरसाठ, आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी
---------