पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:19 AM2018-03-24T00:19:34+5:302018-03-24T00:19:34+5:30
तालुक्यातील तांबवा येथील अंगणवाडी शिक्षिका असलेल्या पत्नीचा खून करून पतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री केज तालुक्यातील तांबवा शिवारातील शेतात घडली. दरम्यान, सध्या तरी कौटुंबिक वादाचे कारण सांगितले जात असले तरी अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील तांबवा येथील अंगणवाडी शिक्षिका असलेल्या पत्नीचा खून करून पतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री केज तालुक्यातील तांबवा शिवारातील शेतात घडली. दरम्यान, सध्या तरी कौटुंबिक वादाचे कारण सांगितले जात असले तरी अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
सुंदर बळीराम मुंडे (वय ५० वर्षे) आणि ललिता सुंदर मुंडे (वय ४६ वर्षे) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत. तांबवा येथील अंगणवाडी शिक्षिका ललिता चाटे यांचा विवाह नागझरी येथील सुंदर बळीराम मुंडे यांच्याशी झाला होता. पत्नीस तांबवा येथे अंगणवाडीची नोकरी असल्याने सुंदर मुंडे यांनी तांबवा येथेच जमीन घेतली आणि तेथेच शेती करून शेतातील घरात राहत असत. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलीचा विवाह झाला आहे तर एक मुलगा मुंबई येथे नोकरीला असून दुसरा औरंगाबाद येथे शिक्षण घेत आहे. त्यामुळे घरात पती पत्नी दोघेच राहत होते.
मागील काही दिवसापासून पती-पत्नीत सातत्याने भांडणे होत होती. सुंदर मुंडे यांनी गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरी जेवण झाल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर सुंदर मुंडे यांनी ललिताचा गळा दाबून खून केला. त्यानंतर सुंदरने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून स्वत:च्या खिशात ठेवले आणि शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सुंदर मुंडे यांचा भाऊ रंगनाथ मुंडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांंनी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर दोघांचेही मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. या घटनेमुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
१५ दिवसांत दुसरी घटना
पंधरा दिवसांपूर्वीच तालुक्यातील ढाकेफळ येथील एका प्रियकराने प्रेयसीचा खून करून जवळच असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच तांबवा शिवारात दुसरी घटना घडल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
एकाच चितेवर अंत्यसंस्कार
केज येथील उपजिल्हा रुग्णालयात मुंडे दांम्पत्यांच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर दोन्हीही पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान तांबवा शिवारातील त्यांच्या मालकीच्या शेतात शोकाकूल वातावरणात दोघांचेही पार्थिव एकाच चितेवर ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आले.