पत्नीचा मृतदेह ठाण्यात आणून पती पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:04 AM2018-12-26T00:04:42+5:302018-12-26T00:04:55+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडीला गेलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती पतीने एक दिवस उशिरा सासरच्या लोकांना कळविली. त्यानंतर जेव्हा नातेवाईक कोल्हापूरकडे निघाले, तेव्हा एका रुग्णवाहिकेमध्ये पत्नीचा मृतदेह थेट गेवराई पोलीस ठाण्यात आणून तो माराच्या भितीने पसार झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडीला गेलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती पतीने एक दिवस उशिरा सासरच्या लोकांना कळविली. त्यानंतर जेव्हा नातेवाईक कोल्हापूरकडे निघाले, तेव्हा एका रुग्णवाहिकेमध्ये पत्नीचा मृतदेह थेट गेवराई पोलीस ठाण्यात आणून तो माराच्या भितीने पसार झाला. त्यामुळे महिलेच्या माहेरच्या लोकांनी गेवराई पोलीस ठाण्यात गोंधळ करत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पोलिसांनी प्रकरण शांतपणे हाताळत पोलिस संरक्षणात मृतदेह मुलीच्या सासरी अंत्यसंस्कारासाठी पाठवला व तेथे अंत्यविधि झाला. हा सर्व प्रकार गेवराई तालुक्यातील शिंदेवाडीत घडला.
तालुक्यातील शिंदेवाडी येथील केशव काळे व त्याची पत्नी कविता हे दोघे ऊस तोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर भागात काही दिवसांपासून होते. २२ डिसेंबर रोजी कविताचा मृतदेह एका विहिरीमध्ये आढळला. तो तेथील पोलिसांच्या उपस्थितीत बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र याबाबतची माहिती केशव काळे याने कविताच्या माहेरच्या लोकांना त्यादिवशी सांगितली नाही. दुसऱ्या दिवशी उशिरा ही माहिती कविताचे माहेर जिरेवाडी येथील बळीराम भावले यांना देण्यात आली. तेव्हा लेकीच्या मृत्यूने दु:खांकित होऊन माहेरचे लोक २४ डिसेंबर रोजी कोल्हापूरकडे निघाले, मात्र त्याची माहिती केशवला झाल्यानंतर त्याने रात्रीतून कविताचा मृतदेह एका रुग्णवाहिकेत टाकून थेट गेवराई ठाणे गाठले. याची माहिती जिरेवाडी येथील नातेवाईकांना दिल्यानंतर त्यांनी मंगळवारी सकाळी पोलिस ठाणे गाठले. केशव याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. केशव काळेची गेल्या तीन दिवसांची वर्तवणूक संशयास्पद असल्याने कविताचे माहेरचे लोक अधिकच भडकले. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुन्हाही तेथेच दाखल होईल, असे समजावून सांगत कविताचा मृतदेह पोलिस संरक्षणात शिंदेवाडीत आणला तेथे अंत्यविधी झाला. या प्रकरणी केशव काळे व रुग्णवाहिका चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.