विम्याच्या एक कोटीसाठी १० लाखांची सुपारी देऊन मारला पती; पत्नीसह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 12:00 PM2022-06-13T12:00:56+5:302022-06-13T12:09:25+5:30
पत्नीने दोन मित्रांना दिली सुपारी; मारेकऱ्यांनी प्रथम दारू पाजली त्यानंतर डोक्यात व्हिल पाना मारून केली हत्या
बीड: पतीनिधनानंतर एक कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी एका महिलेने सुपारी देऊन त्याचा काटा काढला. डोक्यात टामीने मारून हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी अपघात भासविण्यासाठी मृतदेह रस्त्यावर आणून टाकला व टेम्पोवर दुचाकी धडकवली. मात्र, गुन्हे शाखा व बीड ग्रामीण पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन या सिनेस्टाइल मर्डर मिस्ट्रीचा थरारपट उलगडला. यातील पाचपैकी तीन आरोपींना गजाआड केल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी १२ जून रोजी पत्रपरिषदेत दिली.
बीड- नगर मार्गावरील पिंपरगव्हाण (ता. बीड) रोडवर ११ जून रोजी पहाटे एका व्यक्तीचे प्रेत आढळले हाेते. जवळच दुचाकी होती. बीड ग्रामीण पोलिसांनी धाव घेत ओळख पटवली असा मृतदेह मंचक गोविंद पवार (४५, रा. वाला, ता. रेणापूर जि. लातूर, हमु. अंकुशनगर, बीड) याचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह पालथा पडलेला होता. डोक्यात मागील बाजूने वार जखम होती व दुचाकीचे (एमएच १२ एलटी-३२१७) हेडलाईट वगळता कुठेही नुकसान नव्हते. शिवाय पत्नी निर्विकार होती, तर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दु:ख नव्हते.
यावरून पोलिसांना घातपाताचा संशय आला होता. पो.नि. संतोष साबळे, उपनिरीक्षक पवन राजपूत यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला. चौकशीत मंचक पवार यांचा पत्नीनेच सुपारी देऊन काटा काढल्याचे निष्पन्न झाले. उपनिरीक्षक देविदास आवारे यांच्या फिर्यादीवरुन पत्नी गंगाबाई मंचक पवार (३७, रा. वाला, ता. रेणापूर जि. लातूर, हमु. अंकुशनगर, बीड), श्रीकृष्ण सखाराम बागलाने (२७,रा.काकडहिरा ता.बीड),सोमेश्वर वैजीनाथ गव्हाणे (४७,रा.पारगाव सिरस ता.बीड) व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
दहा लाखांची सुपारी, दोन लाख इसार
मंचक पवार यांची सासरवाडी साक्षाळपिंप्री (ता.बीड) आहे. त्यांची पत्नी गंगाबाईच्या भावाचे निधन झाल्याने सासरवाडीची चार ते पाच एकर जमीन मिळाली होती. मात्र, ती गंगाबाईच्या नावे आहे. दरम्यान, मंचक यांच्या नावे एक कोटीचा विमा काढला होता. गंगाबाईचा या पैशांवर डोळा होता. त्यासाठी तिने दोन मित्रांना दहा लाख रुपयांची सुपारी दिली. त्यापैकी दोन लाख इसार म्हणून दिले. सुपारी घेणारे दोघेही फरार असून त्यांच्या इशाऱ्यावर खून करणारे श्रीकृष्ण बागलाने (रा.काकडहिरा, ता. बीड) व सोमेश्वर गव्हाणे (४७, रा. पारगाव सिरस) व गंगाबाई मंचक पवार यांना गुन्हे शाखेने अटक केली.
दारू पाजली, डोक्यात मारला व्हिल पाना
१० जून रोजी चाैघांनी मंचक पवार यांचा खून करण्याचा कट आखला. मंचक पवार हे नेहमी साक्षाळपिंप्री येथे शेतात ये-जा करत. १० रोजी ते नित्याप्रमाणे शेतात गेल्यावर त्यांना संपर्क करून या चौघांनी गाठले. आरोपी टेम्पोतून पिंपरगव्हाण शिवारात पोहोचले. तेथे एका झाडाखाली त्यांनी मंचक पवार यांना दारू पाजली व ते स्वत:ही प्यायले. सोमेश्वर गव्हाणे याने त्यांच्या डोक्यात मागील बाजूला व्हिल पाना मारला. रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.
यांनी केली कारवाई
गुन्हे शाखेचे पोे. नि. सतीश वाघ, ग्रामीण ठाण्याचे पो. नि. संतोष साबळे, उपनिरीक्षक संजय तुपे, हवालदार कैलास ठोंबरे, नसीर शेख, अभिमन्यू औताडे, पो.ना.सतीश कातखडे, अशोक दुबाले, गणेश हंगे, राहुल शिंदे, विकी सुरवसे, संपत तांदळे, गणेश मराडे, अतुल हराळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.