चिमणी - कावळ्याच्या झुंजीत दोन झोपड्या खाक; तीन घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 02:07 PM2018-04-26T14:07:24+5:302018-04-26T14:07:24+5:30
हातोला येथे आज दुपारी १२ वाजता झोपडपट्टीला लागलेल्या आगीत दोन झोपड्या जाळून खाक झाल्या तर तीन घरांचे अतोनात नुकसान झाले.
अंबाजोगाई (बीड ) : तालुक्यातील हातोला येथे आज दुपारी १२ वाजता झोपडपट्टीला लागलेल्या आगीत दोन झोपड्या जाळून खाक झाल्या तर तीन घरांचे अतोनात नुकसान झाले. विजेच्या तारांवरील चिमणी-कावळ्याच्या झुंजीमुळे स्पार्किंग होऊन ठिणग्या उडाल्या यात झोपड्यांनी पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हातोला गावाने वाॅटरकप स्पर्धेत भाग घेतलेला आहे. आज सकाळचे श्रमदान आटोपून लोक गावात आलेले होते. महिला घरांकडे गेल्या होत्या, तर पुरुष लोक गावातील मंदिरासमोर थांबले होते. त्याचवेळी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावातील काही झोपड्यांना आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. वाळलेल्या कुडांमुळे आणि कडक उन्हामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. श्रमदान करून आल्यामुळे सरपंच जयसिंग चव्हाण आणि बहुतांशी ग्रामस्थ गावातच होते, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत माती आणि पाण्याच्या साह्याने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अखेर अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत सुंदर नागोराव पंडित आणि महादेव पिराजी दासूद या दोघांच्या झोपड्या पूर्णपणे जाळून भस्मसात झाल्या होत्या. तसेच प्रभावती लिंबराज माने, विठ्ठल इराप्पा लोखंडे, छायाबाई विलास गायकवाड यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आग लागल्याचे पाहताच झोपड्या शेजारच्या घरातील ग्रामस्थांनी भीतीने गॅस सिलेंडर घराबाहेर आणून टाकले. या दुर्घटनेत सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पाच कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दोन कुटुंबे तर अक्षरशः उघड्यावर आली आहेत.
चिमणी -कावळ्याच्या झुंजीने लागली आग
दरम्यान, सदरील आग चिमणी-कावळ्याच्या झुंजीमुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. झोपड्याजवळून गेलेल्या विजेच्या मुख्य तारांवर चिमणी आणि कावळ्याची झुंज सुरु होती. त्यामुळे हेलकावे खावून तारा एकमेकांना घासल्याने स्पार्किंग झाली आणि ठिणग्या उडून खाली वाळलेल्या गवतावर पडल्या. आधीच उन्हामुळे तापलेल्या गवताने ठिणग्यामुळे लागलीच पेट घेतला आणि आग पसरून झोपड्यापर्यंत पोचली. तारांच्या स्पार्किंगमुळे दुर्घटनेस कारणीभूत ठरलेला कावळा देखील यात ठार झाला.