माझे नुकसान होतेय, मला रुजू करून घ्या; बीड जिल्हा शल्यचिकित्सकाची मंत्रालयात धाव
By सोमनाथ खताळ | Published: August 22, 2022 07:55 PM2022-08-22T19:55:58+5:302022-08-22T19:56:54+5:30
नाशिकमधून कार्यमुक्त बीडमध्ये रुजू होता येत नसल्याने अडचण
- सोमनाथ खताळ
बीड : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सतीश सूर्यवंशी यांची बीडला जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नियूक्ती झाली होती. परंतू अचानक त्यांना रूजू करून घेऊ नये, अशा सुचना संचालकांनी दिल्या होत्या. १५ दिवस झाले तरी त्यांना इतर ठिकाणी पदस्थापना अथवा बीडला रूजू करून घेतले नाही. अखेर डॉ.सूर्यवंशी यांनी सोमवारी प्रधान सचिवांची भेट घेत मला पदावर हजर करून घेण्याबाबत मागणी केली आहे. तसे लेखी पत्रही दिले आहे.
बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक पद मागील १३ महिन्यांपासून रिक्त होते. त्यामुळे माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. ५ ऑगस्ट रोजी डॉ.सूर्यवंशी यांची बीडला नियूक्ती झाली. दुसऱ्या दिवशी लगेच ते रूजू होण्यासाठी लातूरचे उपसंचालक कार्यालयात गेले. परंतू अचानक संचालक कार्यालयातून त्यांना रूजू करून घेऊ नये, असे पत्र प्राप्त झाले. पत्रात कसलेही कारण नमूद नव्हते. त्यामुळे डॉ.सूर्यवंशी यांना इतरत्र पदस्थापना देऊन डॉ.सूरेश साबळे यांची नियमित नियूक्ती होईल, अशी चर्चा होती. परंतू याला १५ दिवस उलटले तरी काहीच कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे डॉ.सूर्यवंशी हे नाशिकमधून कार्यमुक्त झालेले आहेत आणि इकडे पदस्थापना मिळालेली नाही. त्यामुळे इकडे ना तिकडे अशी गत डॉ.सूर्यवंशी यांची झाली होती. अखेर डॉ.सूर्यवंशी यांनी सोमवारी थेट मंंत्रालय गाठून प्रधान सचिवांची भेट घेतली. आपली व्यथा मांडत तात्काळ हजर करून घेण्याबाबत मागणी केली. याबाबत त्यांनी लेखी पत्रही दिले आहे. त्यामुळे यावर लवकर कारवाई होईल, अशी अपेक्षा वाटत आहे.
मी प्रधान सचिवांची भेट घेतली असून हजर करून घेण्याची मागणी केली आहे. याबाबत लेखी पत्रही दिले आहे. तिकडून रिलीव्ह झालो आणि इकडे जॉईन न झाल्याने माझे नुकसान होत आहे.
- डॉ.सतीश सूर्यवंशी