विरोधी पक्षनेतेपदासाठी मीच अनुभवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:06 AM2019-12-10T00:06:36+5:302019-12-10T13:06:53+5:30
महायुतीमध्ये लढलेल्या शंभर टक्के जागा केवळ शिवसंग्राम पक्षानेच जिंकल्या आहेत. विधान परिषदेत आपला सर्वाधिक अनुभव आहे. त्यामुळे भाजपने आपल्याला विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी द्यावी, असे मत आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केले.
बीड : महायुतीमध्ये लढलेल्या शंभर टक्के जागा केवळ शिवसंग्राम पक्षानेच जिंकल्या आहेत. विधान परिषदेत आपला सर्वाधिक अनुभव आहे. त्यामुळे भाजपने आपल्याला विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी द्यावी, असे मत आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केले. परंतु, हा निर्णय घेण्याचा अधिकार हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजप नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. बीड येथे घेण्यात येणाºया व्यसनमुक्ती शिबिराच्या संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सोमवारी ते बोलत होते.
राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर आम्ही विरोधी पक्षात आहोत. आगामी काळात विरोधी पक्षाची कणखर भूमिका बजावणार आहोत. त्यासाठी शिवसंग्रामच्या आमदारांसह नेत्यांना घेऊन रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे, तसेच पाचाड येथे जिजाऊंचे व महाड येथे डॉ. आंबेडकरांच्या चवदार तळ्याच दर्शन घेऊन, पुढील कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्ह्यातील पराभवाचे खापर एकमेकांवर नेते फोडत आहेत. याविषयी विचारले असता मेटे म्हणाले, शिवसंग्राम बीड जिल्ह्यात महायुवतीचा घटक पक्ष नव्हता, अनेकांना आपल्या पक्षाची व फोटोची अॅलर्जी होती. त्यामुळे परभवामध्ये आपली व पक्षाची भूमिका नसल्याचे यावेळी ते म्हणाले. तसेच आम्हाला जिल्ह्यात निवडणुकीवेळी विश्वासात घेतले नाही. तरी देखील शिवसंग्राम पक्षाने व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीचेच काम केले. त्यामुळे कोणाच्या पराभावास आपला पक्ष जबाबदार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मोठ्या शिवसंग्रामचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा
मराठा समाजाचा विश्वास या शासनावरचा उडू नये, तसेच त्यांच्या मनात किंतू-परंतु येऊ नये यासाठी सारथी संस्थेच्या कामकाजास स्थगिती देणाºया झारीतील शुक्राचार्यांना निलंबित करावे व सारथी संस्था पुन्हा पुन्हा पुर्ववत कार्यरत करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे. - आ. विनायक मेटे