"मी नेहमीच सर्वांसाठी काम केलं, मला निकालाची धाकधूक नाही, विजय निश्चित": पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 06:43 PM2024-06-03T18:43:26+5:302024-06-03T18:45:34+5:30

बावीस वर्षे राजकारणात काम करत असताना मी कधी संयम ढळू दिला नाही.- पंकजा मुंडे

"I am not afraid of the result, victory is certain"; Pankaja Munde expressed his belief | "मी नेहमीच सर्वांसाठी काम केलं, मला निकालाची धाकधूक नाही, विजय निश्चित": पंकजा मुंडे

"मी नेहमीच सर्वांसाठी काम केलं, मला निकालाची धाकधूक नाही, विजय निश्चित": पंकजा मुंडे

बीड: बीड लोकसभेचा निकाल काय लागणार? याची धाकधूक मला होत नाही. कारण माझ्या हृदयातील हुरहूरीची जागा साहेबांच्या जाण्यानं घेतली, यापेक्षा दुसरे मोठे दुःख माझ्या आयुष्यात असू शकत नाही. आज जिल्हयाला पिढी बिघडविणारे नव्हे तर पिढी घडविणारे नेतृत्व हवे आहे, त्यामुळे उद्या माझा निश्चित विजय होणार याची मला खात्री आहे, असा विश्वास भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज व्यक्त केला.

गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी हजारो कार्यकर्त्यांच्यासह मुंडे कुटुंबीय गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे आजही आपल्या आचार, विचार आणि श्वासात जिवंत आहेत. मुंडे साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, पिडित व सर्व सामान्य वर्गासाठी खर्ची घातलं. अनेक दुर्लक्षित घटकांना, कार्यकर्त्यांना प्रवाहात आणलं. त्यांच्या विचाराचा वारसा आणि वसा जपण, त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हे माझं दायित्व आहे. मी कधीही हा वसा खाली ठेवणार नाही, असा संकल्प पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

मी सर्वांसाठी काम केले, उद्या विजय निश्चित
तसेच बीड लोकसभा निकालावर देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी मोकळेपणाने मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, बावीस वर्षे राजकारणात काम करत असताना मी कधी संयम ढळू दिला नाही. प्रत्येकांना सोबत घेऊन काम केलं. मी कधी कुणाविषयी अभद्र बोलले नाही. समाजातील कुठल्या वर्गाला, वर्णाला शब्दाने घायाळ केलं नाही. मी नेहमीच जातीपातीच्या पलिकडे जावून सर्व वर्गांसाठी काम केलं आणि पुढेही करत राहणार. यामुळे मला उद्याच्या निकालाची धाकधूक नाही, विजय निश्चित आहे, असा विश्वास देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

देशाच्या भवितव्यासाठी मोदींचं नेतृत्व आवश्यक
उद्याच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅटट्रिक करणार यात कसलीही शंका नाही. कन्याकुमारी येथे ज्याठिकाणी मोदींनी ध्यान केलं त्या स्वामी विवेकानंदांचे वाक्य आहे. 'जितना कठीण संघर्ष होगा, जीत उतनीही शानदार होगी'  देशाचं राजकारण आता बदलत आहे. देशाला पुढे नेण्यासाठी, देशाच्या भवितव्यासाठी मोदींचं नेतृत्व आवश्यक आहे. २०४७ पर्यंत देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचं त्यांचं स्वप्न आहे. ज्या मुंडे साहेबांनी पक्ष संघटनेसाठी आपलं उभं आयुष्य वेचलं त्यांच्या पुण्यतिथीच्या दुसर्‍या दिवशी सत्तेची हॅटट्रिक होणं यापेक्षा काय मोठं असेल, हे यश मुंडे साहेबांनी पक्षासाठी केलेल्या कष्टाच आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Web Title: "I am not afraid of the result, victory is certain"; Pankaja Munde expressed his belief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.