मला नको, पत्नी व मुलीला बघा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:57 PM2019-05-21T23:57:03+5:302019-05-21T23:57:24+5:30
ला काही होत नाही. मला नका पाहू, माझी मुलगी आणि पत्नी कशी आहे, कोठे आहे. त्यांना अगोदर पहा, अशी भावनिक हाक कार अपघातात गंभीररीत्या भाजलेला पिता देत होता तर दुसऱ्या बाजूला सर्व लोक हे ‘ते ठिक आहेत’, असे सांगून आरोग्य कर्मचारी आणि नागरिक त्यांना धीर देत होते.
बीड : मला काही होत नाही. मला नका पाहू, माझी मुलगी आणि पत्नी कशी आहे, कोठे आहे. त्यांना अगोदर पहा, अशी भावनिक हाक कार अपघातात गंभीररीत्या भाजलेला पिता देत होता तर दुसऱ्या बाजूला सर्व लोक हे ‘ते ठिक आहेत’, असे सांगून आरोग्य कर्मचारी आणि नागरिक त्यांना धीर देत होते. स्वत: एवढे भाजलेला असतानाही रक्ताच्या नात्यातील प्रेम आणि काळजी यानिमित्ताने दिसून आली.
मनीषा व ज्ञानेश्वर जाधव (रा.परभणी) हे दाम्पत्य आपल्या १४ वर्षाच्या लावण्याला घेऊन कारने पुण्याला जात होते. गेवराई तालुक्यातील कोळगाव जवळ त्यांच्या कारला अपघात झाला आणि कारने जागीच पेट घेतला.
यामध्ये मनीषा (३५) यांचा कारमध्ये अडकल्याने भाजल्याने जागीच मृत्यू झाला. तर परिसरातील लोकांनी धाव घेत लावण्या व ज्ञानेश्वर यांना बाहेर काढले. तोपर्यंत दोघेही पूर्णपणे भाजले होते. त्यांना अगोदर एका कारने व नंतर रुग्णवाहिकेने बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणले. येथे दरवाजा उघडताच ज्ञानेश्वरने टाहो फोडला. उन्हाचा कडाका आणि आगीने भाजलेले ज्ञानेश्वर तडफडत होते. तरीही ते आपली पत्नी आणि मुलीची काळजी करीत वारंवार त्यांच्याबद्दल विचारणा करीत होते. डॉक्टरांनी लावण्या व ज्ञानेश्वर यांच्या पायाचे ठसे घेत त्यांना तात्काळ जळीत कक्षात दाखल केले.
दवाखान्यातही अंगाची लाही लाही होत असताना ज्ञानेश्वर यांच्या तोंडात केवळ पत्नी आणि मुलीचेच नाव होते. त्यांच्याबद्दलच ते विचारणा करीत होते. रात्री उशिरापर्यंत चकलांबा पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लावण्या निपचित पडली
४या अपघातात लावण्या जवळपास ९० टक्के भाजली होती. तिला जळीत कक्षातील बेडवर टाकले तेव्हा ती बेशुद्धावस्थेत निपचित पडलेली होती. एका अंगावर झोपलेल्या लावण्याचा केवळ उजवा खांदा किंचितपणे हालचाल करताना दिसून आला. ४दुपारी ३.१० मिनिटाने तिने अखेरचा श्वास घेतला. तर ज्ञानेश्वर हे ६३ टक्के भाजले असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.