'बेवारस असलो तरी माझा शेवट बेवारस नको';अखेर अंतिम इच्छा झाली पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 07:05 PM2020-01-17T19:05:24+5:302020-01-17T19:07:42+5:30
ज्या निराधारांना कोणाचा आधार नाही. अशा अनेक निराधारांचे पालकत्व आजही मानवलोक ही संस्था खंबीरपणे सांभाळत आहे.
- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : मी जरी बेवारस असलो तरी माझा अंत्यविधी बेवारसपणे होऊ देऊ नका. माझा अंत्यविधी मानवलोकने करावा, अशी अखेरची इच्छा मारोती सीताराम कदम (वय ५५) यांनी आपल्या मृत्यूपूर्वी व्यक्त केली होती. ही त्यांची अखेरची इच्छा मानवलोकच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केली. ज्या निराधारांना कोणाचा आधार नाही. अशा अनेक निराधारांचे पालकत्व आजही मानवलोक ही संस्था खंबीरपणे सांभाळत आहे.
येथील मारोती सिताराम कदम हे २५ वर्षांपूर्वी अंबाजोगाई शहरात राहयला आले. कुटुंब दुभंगल्याने ते अंबाजोगाईत कोठून आले याचा काहीही थांगपत्ता नव्हता. जोपर्यंत मनगटात बळ होते. तोपर्यंत ते मोलमजुरी करून स्वत:चा उदरनिर्वाह चालवत. मात्र तीन वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा आजार जडला. अन् ते पूर्णत: परावलंबी बनले. अशा निराधारांना अंबाजोगाई व परिसरात मानवलोक परिवाराचा आधार नित्याचा असतो. मानवलोकच्या जनसहयोग कार्यालयाने मारोती कदम यांची नोंदणी करून त्यांना मोफत राशन, निराधार योजनेची सवलत उपलब्ध करून दिली. त्यांचे औषधोपचारही मोफत केले. मात्र, या आजाराचा विळखा त्यांना जडल्याने आठवडाभरापूर्वी त्यांचे निधन झाले. मारोती कदम निराधार असल्याने त्यांचा अंत्यविधी करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाच्या वतीने तात्काळ मिळेना. त्यांना निराधार घोषित केले. कोणीही नातेवाईक मागणी करत नसल्याने शेवटी त्यांचा मृतदेह विनंतीनुसार मानवलोककडे सोपविण्यात आला. मानवलोक जनसहयोगचे कार्यकर्ते शाम सरवदे यांनी मारोतीरावांचे पुत्र होऊन सर्व अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले व मारोतीरावांची अखेरची इच्छा पूर्ण केली. या अंत्यविधीसाठी मानवलोकच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अंबेकर, रमाकांत उडाणशिव, शेख मुख्तार, गंगाधर ढोणे, दिलीप मारवाळ, सतीश कांबळे यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेतला.