लग्न करीन तर त्याच्यासोबतच, बीडमध्ये खडतर प्रेमाचा आनंदोत्सवाने समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 07:49 PM2020-05-16T19:49:34+5:302020-05-16T19:52:30+5:30
शनिवारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साध्या पद्धतीने पण आनंदात पार पडला. त्यांच्या प्रेमाचा खडतर सुरू झालेला प्रवास अखेर आनंद सोहळ्याने पूर्ण झाला.
बीड : शेजारीच राहणाऱ्या भावकितील मुलीला घेऊन पलायन केले. एक मुलगीही झाली. नंतर पोलिसांनी शोधून आणल्यावर प्रियकरावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. परंतू मुलगी ठाम राहिली. लग्न करीन तर त्याच्यासोबतच, असा तिने हट्ट धरला. मग न्यायालयाने यावर योग्य ती कारवाई करून त्या दोघांचा विवाह लावण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे शनिवारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साध्या पद्धतीने पण आनंदात पार पडला. त्यांच्या प्रेमाचा खडतर सुरू झालेला प्रवास अखेर आनंद सोहळ्याने पूर्ण झाला.
धारूर तालुक्यातील एका गावात सुरेश व सोनाली (नाव बदललेले) हे शेजारीच राहतात. भावकीच असल्याने दोघांचेही जवळचे नाते. त्यांनी ९ डिसेंबर २०१७ रोजी पलायण केले. धारूर ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही नोंद झाला. सोनाली तेव्हा १७ वर्षांची होती. ते दोघेही पुण्यात राहिले. सुरेशने कंपनीत काम केले तर सोनाली घरीच राहत होती. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते. २०१८ साली सोनाली गर्भवती राहून तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०१९ रोजी पोलिसांनी तपास करून त्यांना ठाण्यात आणले. त्यानंतर सुरेशविरोधात आगोदरच्या गुन्ह्यात अत्याचार, पोस्को आदी कलमे वाढली. हे प्रकरण माजलगाव न्यायालयात गेले.
दरम्यान, न्यायालयातही सोनालीने बाजू बदलली नाही. संसार करील तर सुरेश सोबतच, असे तिने मनाशी ठाम निश्चीत केले होते. न्यायलायानेही सर्व बाजू समजून घेत त्या दोघांचे लग्न लावण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे शनिवारी बीडमधील सामाजिक न्याय भवनात बौद्ध पद्धतीने त्यांचा विवाह साध्या पद्धतीने पण आनंदाच्या वातावरणात पार पडला. त्यांच्या प्रेमाला अखेर न्याय मिळाला, अशी चर्चा होती.
अधिकारी बनले नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते वऱ्हाडी
या विवाह सोहळ्यात सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, महिला व बालविकास अधिकारी आर.डी. कुलकर्णी हे मुलीचे मामा झाले तर जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजू एडके, वित्त व लेखा अधिकारी शिवप्रसाद जटाळे हे मुलाचे मामा बनले. जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे हे भंते बनले आणि सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे व अशोक तांगडे यांनी वऱ्हाडी म्हणून भूमिका बजावली.
शासकीय वाहनातून बिदाई
आनंदात विवाह सोहळा पार पडल्यानंतर सोनालीला फुलांनी सजलेल्या शासकीय वाहनातून बिदाई करण्यात आली. सोहळ्याला रक्ताचे नातेवाईक कोणीच नव्हते. अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांचे आशिर्वाद घेऊन हे जोडपे संसार करण्यासाठी वाहनात बसून गावाच्या दिशेने रवाना झाले.