‘तु मला खुप आवडतेस, आय लव्ह यू’ असे म्हणत डॉक्टर विद्यार्थिनीचा धरला हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 07:15 PM2019-05-13T19:15:40+5:302019-05-13T19:19:57+5:30
पाच महिन्यांपासून छेडछाड सुरू असताना शिक्षण बंद होण्याच्या भीतीने केली नव्हती तक्रार
बीड : काय चाललय, कशी आहेस. तु मला खुप आवडतेस, आय लव्ह यू... असे म्हणत एका डॉक्टर विद्यार्थिनीचा वर्गमित्रानेच हात धरला. त्यानंतर तिला टाँट मारल्याचा प्रकार बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी सकाळी ११ वाजता घडला. याप्रकरणी तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात २२ वर्षीय तरूणी शिक्षण घेत आहे. मागील तीन वर्षापासून ती बीडमध्ये राहते. सध्या महाविद्यालयाला सुट्टया आहेत. तसेच ती महाविद्यायलाच्या वसतिगृहातच वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी ती नाश्ता करण्यासाठी जवळीलच एका हॉटेलात गेली होती. याचवेळी तेथे विलास राठोड, तानाजी सखनूर व अनिकेत सागळे हे आले. त्यांनी तरूणीला पाहून टाँट मारले. परंतु तीने याकडे दुर्लक्ष केले. हॉटेलमधून बाहेर पडतानाच विलासने तिला आडवले. ‘काय चाललय, कशी आहेस. तु मला खुप आवडतेस, आय लव्ह यू...’ असे म्हणत तिचा हात पकडला. यावर तीने आपण प्राचार्यांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. यावर त्यांनीही तिला हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
तेथून कशीबशी सुटका करून पीडिता वसतीगृहात आली आपल्या मामेभावाला हा प्रकार सांगितला. त्यांनी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि घडला प्रकार कथन केला. त्याप्रमाणे तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पैकी विलास व तानाजी यांना पोलिसांनी अटक केली असून अनिकेत हा अद्यापही फरार असल्याचे पोली सूत्रांनी सांगितले.
पाच महिन्यांपासून छेडछाड सुरूच
सदरील तिनही तरूण हे या डॉक्टर तरुणीची मागील चार ते पाच महिन्यांपासून छेड काढत होेते. वर्गात बसल्यावरही टाँट मारत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आपले शिक्षण बंद होईल, उगाच अडचण नको, म्हणून सदरील पीडितेने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. सोमवारी त्यांनी जास्तच केल्याने पीडितेने ठाणे गाठून फिर्याद दिली. केवळ भितीपोटी आपण शांत बसल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.