'माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती'; परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 03:03 PM2021-09-28T15:03:44+5:302021-09-28T16:00:56+5:30
'पुढील निवडणुकीत परळीत धनंजय मुंडेना कुणी रोखू शकणार नाही.'
बीड: राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील काल राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान काल संध्याकाळी धनंजय मुंडेचा मतदारसंघ असलेल्या परळीमध्ये ढोल-ताशा-डीजेचा गजर तसेच, पुष्पवृष्टी आणि क्रेनद्वारे मोठ-मोठ्या हारांनी जयंत पाटलांचे जंगी स्वागत करण्यात आले. परळीतील नागरिकांनी केलेल्या या अभूतपूर्व स्वागतामुळे जयंत पाटल पार भारावून गेले.
माझ्या लग्नातही एवढी वरात नव्हती...
जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रेचे तिसरे पर्व सुरू झालं आहे. काल ही यात्रा बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात आली असता जयंत पाटलांनी बैठकीचे आयोजन केलं होतं. पण, कार्यकर्त्यांची इतकी गर्दी जमली की, बैठकीचे रुपांतर भव्य मेळाव्यात झाले. धो धो पडत असलेल्या पावसात प्रचंड उत्साहात परळी मतदारसंघातील प्रत्येक गावात व शहरातील रस्त्यांवर जागोजागी जयंत पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे भारावून गेलेल्या जयंत पाटलांनी आपल्या भाषणादरम्यान, 'माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती', अशी भावूक प्रतिक्रिया दिली.
'परळीकरांचे प्रेम बघता पुढील दहा निवडणुकादेखील धनंजय मुंडे यांना कोणी थांबवू शकत नाही'
येत्या काळात परळीचा विकास होणार
यावेळी आपल्या भाषणात जयंत पाटलांनी धनंजय मुंडे यांचे भरभरुन कौतुकही केलं. धनंजय मुंडे हे अत्यंत प्रतिभावान नेते आहेत, पुढील निवडणुकीत परळीत त्यांना कुणी रोखू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, येत्या काळात परळी मतदारसंघासह राज्यभरात त्यांच्या हातून मोठे विकासकार्य होणे अपेक्षित आहे. परळी मतदारसंघाचाही त्यांच्या हातून बारामतीसारखा विकास होईल, त्यासाठी परळीकरांनी कायम पाठीशी राहून आपल्या धनुभाऊंना पाठबळ द्यावं, असे आवाहन पाटलांनी केलं.
मातीचे व पक्षाचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही
यावेळी धनंजय मुंडे यांनीही पक्षाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मला सर्वांनी खलनायक ठरवलं होतं. लोकांच्या भावनिक प्रचारामुळे अनेकांनी मला शिव्या घातल्या, परंतु परळीच्या मातीतील माणसांनी मला उभारी दिली. पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी मला संधी दिली आणि आज मी राज्याचा मंत्री होऊ शकलो. या मातीचे व पक्षाचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.