'कसम खाता हूँ, झूट नही बोलुंगा'; केबीसीच्या नावाखाली महिलेला ३ लाखांना गडविले
By संजय तिपाले | Published: December 8, 2022 01:17 PM2022-12-08T13:17:02+5:302022-12-08T13:17:43+5:30
व्हॉटस्अपवर धाडला मेसेज : १७ टप्प्यांत सायबर भामट्याने उकळली रक्कम
बीड: सामान्य शेतकरी कुटुंबातील महिलेला केबीसीची (कौन बनेगा करोडपती) २५ लाखांची लॉटरी व आलिशान गाडीचे आमिष दाखवून सायबर भामट्यांने लाखोंना गंडविले. दिदी... कसम खात हूँ.. झूट नही बोलुंगा... असे म्हणत त्याने विश्वास संपादन केला अन् महिनाभरात सुमारे तीन लाख रुपये उकळले.पहाडी दहिफळ (ता.धारुर) येथे ७ डिसेंबरला हा प्रकार उघडकीस आली. याप्रकरणी धारुर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
अश्विनी मुंजाबा नांदे (२५,रा.पहाडी दहिफळ ता.धारुर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. सासू, सासरे, पती व तीन मुली असा अश्विनी यांचा कुटुंबकबिला. शेती करुन उदरनिर्वाह भागविणाऱ्रूया अश्विनी यांना २९ ऑक्टोबरला सकाळी साडेअकरा वाजता व्हॉटस्अपवर अनोळखी व्यक्तीने मेसेज पाठवून आपणास केबीसीची २५ लाखांची लॉटरी व आलिशान कारचे बक्षीस लागल्याचे कळविले. यानंतर अश्विनी यांनी संबंधितास फोन केला असता समोरुन बोलणाऱ्रूा व्यक्तीने आपले नाव रामचंद्रकुमार असल्याचे सांगितले.
अश्विनी यांनी आधी २५ लाख रुपये पाठवा, असे म्हटले असता रामचंद्रकुमार याने अकाऊंट क्रमांक, आधार, पासपोर्ट फोटो पाठविण्यास सांगितले. तुमचे पैसे एटीएम मशीनमध्ये टाकून ठेवलेले असून वेगवेगळी कारणे देऊन पैसे मागण्यास सुरुवात केली. तीन लाख रुपये दिल्यानंतरही लॉटरी व गाडीची पूर्तता न झाल्याने अश्विनी यांनी तातडीने सायबर विभागाकडे धाव घेतली. पो.नि.रवींद्र गायकवाड, उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी त्यांची कैफियत जाणून घेतली. त्यानंतर धारुर ठाण्यात ७ डिसेंबरला रामचंद्रकुमार नावाच्या भामट्यावर फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक अधीक्षक पंकज कुमावत तपास करत आहेत.
महिनाभरात रामचंद्रकुमार याने वेगवेळ्या कारणावरुन अश्विनी नांदे यांच्याकडे पैशांची मागणी करत राहिला. लॉटरीच्या आमिषाने अश्विनी नांदे यांनी वेगवेगळ्या अकाऊंटवर तसेच क्यूआर कोडवर पैसे टाकत राहिल्या. उसनवारी करुन त्यांनी पैशांची तजवीज करुन १७ टप्प्यांत सुमारे २ लाख ९५ हजार ३०० रुपये भरले. मात्र, त्याने २५ लाखांची लॉटरी रक्कम व आलिशान कार देण्यास टाळाटाळ केल्यावर फसवणूक झाल्याचे अश्विनी यांच्या लक्षात आले.