दुसऱ्याकडून १ लाख १० हजार घेतो, तुम्ही जवळचे म्हणून ६५ हजारच द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:37 AM2021-02-20T05:37:52+5:302021-02-20T05:37:52+5:30
बीड : वाळूची गाडी सुरू करायची असेल, तर आगोदर हप्ता द्या. दुसऱ्यांकडून १ लाख १० हजार घेतो; पण तुम्ही ...
बीड : वाळूची गाडी सुरू करायची असेल, तर आगोदर हप्ता द्या. दुसऱ्यांकडून १ लाख १० हजार घेतो; पण तुम्ही खूप जवळचे आहात, त्यामुळे ६५ हजार रुपयेच द्या, असा संवाद माजलगावच्या उपजिल्हाधिकाऱ्याने तक्रारदाराशी केल्याचे समोर आले आहे. यावरून वाळूतील ‘अर्थकारण’ चव्हाट्यावर आले आहे.
माजलगाव येथील उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड व त्याचा वाहनचालक लक्ष्मण काळे या दोघांना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ६५ हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी रात्री पकडले होते. त्याला तीन दिवसांची न्यायालयाने पोलीस कोठडीदेखील सुनावली आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी संबंधित तक्रारदाराशी संवाद साधला. यात त्यांनी गायकवाडशी झालेल्या संवादाचा पाढा वाचला. गायकवाड याने माजलगावसह तालुक्यात दादागिरी सुरू केली होती. वाळूचे भाव वाढले आहेत. त्यामुळे तुम्हीदेखील माझा हप्ता वाढवा. दुसऱ्याकडून १ लाख १० हजार रुपये महिन्याला घेतो. तुम्ही जवळचे आहात. त्यामुळे तुम्हाला थोडी सूट देतो. तुम्ही फक्त ६५ हजार रुपयेच द्या, असा सल्ला गायकवाडने तक्रारदाराला दिला होता; परंतु लाच देण्याची मानसिकता नसल्याने तक्रारदाराने थेट एसीबी कार्यालय गाठले आणि तक्रार दिली. त्यानंतर चालक काळेमार्फत ६५ हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
चौकट,
मोबाइलवर आकडे टाइप करून इशारा
वाळूचे हप्ते ठरविण्यासाठी महसूलमधील हे अधिकारी सुरुवातीला तोंडाने लाचेची मागणी करत नव्हते. मोबाइलवर कॅल्क्युलेटर लावून त्यावर हप्त्याची रक्कम टाइप केली जायची. त्यावरून हप्ता वसुली केली जात होती; परंतु तक्रारदाराशी संवाद साधताना त्याने थेट तोंडाने लाचेची मागणी केल्याचे सांगण्यात आले.
चौकट,
बीड एसीबीचीही मोठी कारवाई
बीड एसीबीच्या पथकाने पाटोद्याचा गटविकास अधिकारी नारायण मिसाळ याला आदल्या दिवशीच ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. मिसाळ न्यायालयीन कोठडीत जात नाही तोच गायकवाड आणि काळे हे नवे पाहुणे एसीबीकडे आले.